दुस-यांना श्रेय देते ती स्त्री
By admin | Published: December 22, 2014 05:22 AM2014-12-22T05:22:24+5:302014-12-22T05:22:24+5:30
भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो
पुणे : भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो. मुले-कुटुंब यशाच्या शिखरावर गेली, की मी काही नाही केले, असे भाबडेपणाने सांगते. दुसऱ्यांना श्रेय देते ती खरी स्त्री असते, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
इंदुमती बनसीलाल संचेती यांच्या स्मरणार्थ संचेती ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार चेनसुख संचेती, माधुरी मिसाळ, नगरसेवक अॅड. अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, अखिल भारतीय श्वेतांबर जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेणू जैन, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, विजय भंडारी, कांतिलाल जैन, वालचंद खरवड, विमल बाफना, प्रमिला सांकला, संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कंचनबाई बुरड व जयाबाई नहार यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़
सत्यनारायण म्हणाल्या, आजच्या काळात काम करणाऱ्या महिलांचा बोलबाला आहे. पण ज्या महिला घरी राहून कुटुंब उभे करतात, पिढ्या घडवितात त्यांच्याकडेही लक्ष द्यायला हवे, अशा स्त्रियांचा सन्मान होणे गरजेचे आहे.
चेनसुख संचेती म्हणाले, आईच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. आईचे प्रेम, वडिलांचा सल्ला आणि भावंडांची काळजी या तिन्ही गोष्टींवर लक्ष देणारे कुटुंब सुदृढ बनते.
मिसाळ म्हणाल्या, मुलांच्या जडणघडणीत वडिलांचाही हातभार असतो. त्यामुळे त्यांचाही सन्मान व्हायला हवा. अभय छाजेड म्हणाले, थोर व्यक्तींच्या नावे दिले जाणारे पुरस्कार समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. या वेळी संजय चोरडिया, शैलेश बाफना, पन्नालाल लुनावत आदींचा सत्कार करण्यात आला.