अनैतिक संबंधातून मित्राचा खून करणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:19+5:302021-09-09T04:16:19+5:30
पुणे : अनैतिक संबंधातून त्रास देणाऱ्या मित्राला दांडक्याने मारहाण करून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी महिलेला न्यायालयीन कोठडी ...
पुणे : अनैतिक संबंधातून त्रास देणाऱ्या मित्राला दांडक्याने मारहाण करून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी महिलेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र आरोपी महिलेची लोहगाव भागात दहशत आहे. तिला जामीन मिळाला तर ती साक्षीदारांवर दबाव टाकू शकते, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरीत आरोपी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
शबनम हनिफ शेख ऊर्फ तन्वी राहुल वाघेला (वय ३०, रा. गुरुव्दारा कॉलनी, लोहगाव) असे जामीन फेटाळलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सनी ऊर्फ शन्नू सुदाम गाडे (वय २९), मोहम्मद शरीफहुसेन कुरेशी (वय २३) आणि सलीम मुतुर्जा शेख (वय ३६, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली असून, सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सुमित दिलीप जगताप (वय ३४, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोहगावमधील ब्रह्मदेव नर्सरीजवळ ३ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली होती.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर असून, आरोपी महिलेचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आरोपी महिलेच्या घरझडतीत सापडलेल्या मोबाइलमध्ये चित्रफीत आढळून आली आहे. त्यात खून होण्यापूर्वी ३ एप्रिलला मयत सुमित जगताप, सनी ऊर्फ शन्नू गाडे, शबनम शेख ऊर्फ तन्वी वाघेला, सलीम शेख, मोहम्मद कुरेशी हे कलवड वस्ती भागात मद्यप्राशन करून नाचताना दिसत आहेत. खुनापूर्वी मयत व्यक्ती आणि चारही आरोपी हे एकत्र दारू पित असल्याचे दिसून आले आहे. आरोपी महिलेने मयत सुमित यास प्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ३० जून २०२१ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.