महिलेचा खून; पतीवर गोळीबार, थेऊर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ५ जण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:45 IST2025-01-06T09:44:56+5:302025-01-06T09:45:03+5:30
आरोपी लघुशंकेसाठी थांबले असताना रखवालदाराने त्यांना हटकले, त्यावेळी आरोपींनी रखवालदारच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच त्याच्या पत्नीला दगड फेकून मारला

महिलेचा खून; पतीवर गोळीबार, थेऊर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ५ जण गजाआड
पुणे : महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
मयूर शंकर जाधव (वय ३२, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), प्रथमेश ऊर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा. केळगाव, चिंबळी-आळंदी रस्ता, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात आरोपी जाधव, वाहिले आणि तीन साथीदार मोटारीतून आले. मोकळ्या जागेत आरोपी लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी रखवालदार अक्षय चव्हाण याने आरोपींना हटकले. आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच त्याची पत्नी शीतलला दगड फेकून मारला. दगडफेकीत शीतल गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी भानुदास शेलार, अजय मुंढे, सतीश ऊर्फ नाना मुंढे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
त्यांच्या बरोबर असलेले आरोपी जाधव, वाहिले यांचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून शोध घेण्यात येत होता. जाधव आणि वहिले यांना खेड शिवापूर परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, वाहीद पठाण, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांनी ही कारवाई केली.