'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:28 PM2024-07-30T13:28:24+5:302024-07-30T13:28:48+5:30
विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले, त्यामुळे माझ्या कुटुंबात गैरसमज वादविवाद सुरु झाले आहेत
किरण शिंदे
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. परवानगी न घेता या महिलेचा फोटो जाहिरात फलकावर छापल्याने या महिलेने ही तक्रार दिली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या नावाने असलेला हा तक्रार अर्ज या महिलेने सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर रंजनकुमार शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह सिद्धार्थ शिरोळे यांचा देखील फोटो आहे. त्यासोबतच या फोटोमध्ये नात्यांचा मान, माय बहिणचा सन्मान अशा मथळ्याखाली दोन महिलांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. आणि याच फोटो वरून आमदार सिद्धार्थ शिरोळेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
नम्रता कावळे नावाच्या महिलेने याप्रकरणी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे हा तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहीण या योजनेला धरून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले. हे फोटो प्रसिद्ध झाल्याने माझ्या कुटुंबात गैरसमज आणि वादविवाद सुरू झाले आहेत. अयोग्य चुकीचे मनमर्जी आणि बोगस काम केलेले शिरोळेबद्दल लेखी तक्रार देत आहे. अशा आशयाची तक्रार देण्यात आली आहे. पुणे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.