रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 08:17 PM2018-07-28T20:17:54+5:302018-07-28T20:18:41+5:30
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता.
पुणे : घटस्फोटाचा खटला मागे घे, अशी धमकी देत वार करत रॉकेल ओतून पतीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. टेकाळे यांनी तिघांना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शुक्रवारी (२७ जुलै) रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास डीपी रोडवर ही घटना घडली. पत्नी मंगल सखाराम गायकवाड (वय ३३, रा. जनता वसाहत), मेहुणा दादासाहेब रघुनाथ खडागळे (वय २३, रा. पर्वती) आणि सखाराम खंडू भदिर्गे (वय ५३, रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पती सखाराम शिवाजी गायकवाड (वय ५३, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. सखाराम आणि मंगल हे पती-पत्नी आहेत. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यास मंगल यांचा विरोध होता. त्याच रागातून सखाराम हे डीपी रस्त्यावर टेम्पो घेवून थांबले असता खडागळे, भदिर्गे यांनी त्यांना शिवीगाळ करत घटस्फोटाची केस मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यावेळी सखाराम यांच्या हातावर, पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांनी सखाराम यांच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना कोठडी सुनावली.