पुण्यात महिला असुरक्षित! भररस्त्यात अल्पवयीन मुलींची छेड, विरोध करताच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:20 IST2022-11-21T13:20:28+5:302022-11-21T13:20:28+5:30
मुलींनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना

पुण्यात महिला असुरक्षित! भररस्त्यात अल्पवयीन मुलींची छेड, विरोध करताच मारहाण
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातत्याने महिलांची महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणारे प्रकार घडत असतात. पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून असाच प्रकार उघडकीस आला आहे. किराणा दुकानात सामान आणण्यासाठी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. या मुलींनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी आदित्य शिंदे उर्फ गोऱ्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींच्या आईने या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामटेकडी परिसरातील नुरुल अंजुमन मस्जिदसमोर शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी भादवी 354, 354 अ, 354 ब, 323 पोक्सो 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या 16 आणि 13 वर्षे वयाच्या मुली सामान घेण्यासाठी किराणा दुकानात चालल्या होत्या. यावेळी नुरुल अंजुमन मस्जिदसमोर राहणारा आरोपी आदित्य शिंदे यांनी या मुलींचा रस्ता अडवत त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक मागितला. मुलींनी मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने आरोपीने यातील एका मुलीला ओढणीद्वारे जवळ ओढले. त्या मुलीने त्याला विरोध केला असता तिच्या कानाखाली चापट मारली. दुसऱ्या मुलीसोबतही त्याने अश्लील चाळे केले आणि तिच्या देखील कानाखाली मारली.
या सर्व प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.