बारामती बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक; शहर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:35 PM2023-05-18T12:35:25+5:302023-05-18T12:40:02+5:30
दक्ष वाहक व प्रवाशांच्या मदतीने या दोघींना पोलिसांनी पकडले....
बारामती : एसटी बसमध्ये महिला चढताना गर्दीचा फायदा घेत बारामती बसस्थानकावरून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. दक्ष वाहक व प्रवाशांच्या मदतीने या दोघींना पोलिसांनी पकडले.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी ही माहिती दिली. या माहितीनुसार, सोना घायाळ काळे (३८, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) व सुनीता तात्या शिंदे (४५, रा. मडक-खडक, निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी या महिलांची नावे आहेत. एसटी बस प्रवास तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. महिला सन्मान योजनेमुळे बहुसंख्य महिला एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे एसटी बसमधील होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवत या दोन महिला आपला हात साफ करून घेत होत्या. विशेषतः एसटी बसमध्ये महिला चढताना एखाद्या महिलेला संशयित महिला घेरतात. धक्काबुक्कीमध्ये हळूच गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची साखळी आदी चोरले जाते.
बुधवारी (दि. १७) अशाच पद्धतीने दक्ष वाहक व प्रवाशांच्या मदतीने या दोघींना पोलिसांनी पकडले. त्यांना पोलिस ठाण्यात आणत झडती घेतली असता त्यांच्याकडे दीड तोळ्याचे मंगळसूत्र मिळून आले. ते कोणाचे आहे, याबाबत त्यांना माहिती देता आलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी स्वत:हून फिर्याद दाखल करून घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कलम १२४ नुसार त्यांची चौकशी केली जात आहे. बारामती बसस्थानकावरून महिलांचे दागिने चोरीला गेले असल्यास त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, ही कामगिरी उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहायक फौजदार संजय जगदाळे, महिला पोलिस कर्मचारी सुप्रिया कांबळे, मोना माकर, ऋतुजा गवळी, संध्याराणी कांबळे आदींनी केली.