गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:56 PM2021-05-18T20:56:28+5:302021-05-18T20:57:32+5:30
ही घटना 8 मार्च ते 13 मार्च 2020 दरम्यान हॉटेल अरोरा टॉवर लष्कर भागात घडली...
पुणे : गँगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असल्याचे सांगून पिस्तुलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत 25 लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला लष्कर पोलिसांनीअटक केली. आरोपी महिलेला न्यायालयाने 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 39 रा.अनिता अपार्टमेंट जांभूळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी या गुन्हयातील इतर आरोपी धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा.मुपो धानोरे, विकासवाडी, ता.खेड) आणि मंदार सुरेश वाईकर ( वय 41 रा. वनतेय सोसायटी, बिबवेवाडी कोंढवा रोड) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजेश जवळेकर (वय 48 रा. भाग्यतारा सोसायटी, कात्रज कोंढवा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना 8 मार्च ते 13 मार्च 2020 दरम्यान हॉटेल अरोरा टॉवर लष्कर भागात घडली . आरोपी महिलेने संगनमत करून फिर्यादींना त्यांची पत्नी व मेव्हणीने माझ्याकडे तक्रार केली आहे. तुमच्या विरूद्ध कारवाई करण्यासाठी माझ्या लेटरहेडवर भारती विद्यापीठ येथे तक्रार अर्ज केला आहे. जर तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायचा नसेल तर मला 50 लाख रूपये द्यावे लागतील. मी 25 लाख घेईन आणिउर्वरित तुमची पत्नी, मेव्हणी आणि मंदारला देणार आहे असे आरोपी प्रियदर्शनी हिने फिर्यादींना सांगून पिस्तुलचा धाक दाखवून धमकावले. जर 50 लाख रूपये दिले नाहीत आणि पत्नीला घटस्फोट दिला नाहीस तर तुला गोळ्या घालून ठार मारले जाईल. मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. जीव प्यारा असेल तर सांगितलेले ऐक, त्याचे परिणाम भोगावे लागतील. फिर्यादींना इतकी मोठी रक्कम देणे शक्य न झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून धीरज साबळे याला घटनास्थळी रंगेहाथ पकडले. त्याने गुन्हयाची कबुली दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे हिला 18 मे ला 12.30 वाजता अटक करून पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
गुन्हयात वापरलेले पिस्तुल हस्तगत करायचे आहे तसेच हे पिस्तुल कुठून आणले? या गुन्हयात छोटा राजनचा प्रत्यक्ष काही संबंध आहे का? याबाबत तपास करायचा आहे त्यामुळे सरकारी वकील संतोषकुमार पटले यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
----------------------