'प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं कलावंत महिला दुखावल्या गेल्या', सुरेखा पुणेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:58 PM2021-09-15T19:58:13+5:302021-09-15T20:03:19+5:30
दरेकर यांनी केलेलं वक्तव्य महिलांशी जोडलं जातंय तर "गालाची लाली" हे शब्द कलाक्षेत्राला जोडले जात आहेत
पुणे : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महिला चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच सुरेखा पुणेकर यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
''पक्ष एकमेकांवर टीका करतच असतात. पण दरेकर यांनी केलेलं वक्तव्य महिलांशी जोडलं जातंय. "गालाची लाली" हे शब्द कलाक्षेत्राला जोडले जात आहेत. एक कलावंत आणि स्त्री म्हणून मला वाईट वाटलं. मी दरेकरांचा निषेध करते. त्यांनी असं बोलायला नको होतं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला दुखावल्या गेलेल्या आहेत. दरेकरांच्या वक्तव्यावर सुरेखा पुणेकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकमतनं त्यांच्याशी संवाद साधला.''
''महिलांचा आदर करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मला पक्ष प्रवेश करायचाच होता, पण कामाच्या व्यापामुळे मी करू शकले नाही. पण लॉकडाऊनच्या काळात उमगलं. कलाकारांची आणि गरीब लोकांची सेवा करायला हवी. आजपर्यंत मी कलेची सेवा केली, पण आता राजकारणात येऊन गरीब जनतेची सेवा करायची आहे. पक्षाचे मुंबई पदाधिकारी मनोज व्यवहारे यांच्याशी माझा आधी संपर्क झाला. पदाचा काहीच विषय नाही. पक्षाकडून किंवा माझ्याकडून तसं बोलणं झालेलं नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.''
पद मिळालं तर मी पण कलाकारांच्या समस्येकडे अधिक चांगलं लक्ष देऊ शकेन
''पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेऊन मी लोकांना मदत करणार. महिला आयोगाला अध्यक्ष आणि महिला सुरक्षा संदर्भातही एक महिला नेमायला पाहिजे. मी हा मुद्दा पक्षातील सदस्यांपुढे मांडणार. केवळ 'महिला सुरक्षा' यावर काम करायला एक स्वतंत्र व्यक्ती राज्यात नेमायला हवी. मी कलाक्षेत्राकडे विशेष लक्ष देणार. मला जर एखादं पद मिळालं तर मी पण कलाकारांच्या समस्येकडे अधिक चांगलं लक्ष देऊ शकेन अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीये.