महिला तहसीलदारांची कारवाई : तीन ट्रक, १ क्रेन आणि बोटी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 20:58 IST2018-10-08T20:52:11+5:302018-10-08T20:58:15+5:30
वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे.

महिला तहसीलदारांची कारवाई : तीन ट्रक, १ क्रेन आणि बोटी जप्त
भिगवण : महिला तहसीलदार असल्याने रात्री अपरात्री उजनी धरणक्षेत्रात येऊन कारवाई काय करणार नाहीत, या वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे.
इंदापूर तालुक्याच्या महिला तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी कारवाईचा धडाका देत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका घेऊन वाळू माफियांना मदत करणारे क्रेन व्यावसायिक तसेच शिफ्टिंग व्यावसायिक आणि दुरुस्ती करणारे फब्रिकेशन व्यवसाय यांच्या मालकावर कारवाई करणार आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे तहसीलदार मेटकरी यांनी सांगितले.
उजनी धरणातील वाळूउपसा काही दिवसांपूर्वी असणाऱ्या तहसीलदार पाटील यांच्या खमक्या कामगिरी मुळे बंद होता. मात्र, त्यांची बदली झाल्याने वाळू माफियांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. बंद असणाऱ्या बोटींचे सर्व्हिसिंग करून तसेच दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी वाळू उपसण्यास सुरुवात केली होती. गेले काही दिवस या उपशाची तहसीलदारांनी माहिती घेऊन कारवाईला सुरवात केली होती. मात्र, महसूल विभागातील काही कर्मचारी तसेच खबरी यंत्रणेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने काही वेळा कारवाईवर मर्यादा येत होत्या. त्यामुळे सापडलेल्या बोटी आणि फायबर पळवून नेण्यास मदत झाली होती. त्यामुळे तहसीलदार मेटकरी यांनी स्वत: लक्ष देत वाळू उपसा रोखण्यासाठी पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी (दि. ७) रात्री दोनच्या सुमारास उजनी परिसरात कारवाई केली. तीन वाळू वाहतूक करणारे डंपर, क्रेन आणि शिफ्टींग करणारे वाहन जप्त करून भिगवणपोलिसांच्या ताब्यात दिले.