पाण्यासाठी पुणे महापालिकेसमोर महिलांचा हंडा गरबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 07:38 PM2019-10-07T19:38:40+5:302019-10-07T19:41:21+5:30
अनेक महिने तक्रार करूनही पाणी न मिळाल्याने बोपोडी भागातील महिलांनी पुणे महापालिकेसमोर हंड्याच्या साहाय्याने गरबा खेळून निषेध केला.
पुणे : अनेक महिने तक्रार करूनही पाणी न मिळाल्याने बोपोडी भागातील महिलांनी पुणे महापालिकेसमोर हंड्याच्या साहाय्याने गरबा खेळून निषेध केला.
निवडणुकांची आचारसंहिता लागल्यावर पुणे महापालिका प्रशासनालाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत तर अनेक भागात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बोपोडी भागात अनेक महिन्यांपासून पुरेसे पाणी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे आगामी सण साजरे करतानाही नागरिकांना मनस्ताप होणार आहे. अखेर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर म्हणाल्या की, 'कितीही वेळा पालिकेकडे तक्रार केली तरी अधिकारी दखल घेत नाहीत. लोक पहाटेपासून पाण्याचा शोध घेत दारोदार फिरतात. आता तरी महापालिकेने दखल घ्यावी अन्यथा अधिक मोठे आंदोलन उभारु'.