Pankaja Munde: महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:19 PM2024-10-05T13:19:47+5:302024-10-05T13:20:09+5:30

घरातील महिलेने काम करून उत्पन्न मिळवणे ही काळाची गरज झाली आहे

Women don't want free money Give zero interest loans they will be able Pankaja Munde | Pankaja Munde: महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील - पंकजा मुंडे

Pankaja Munde: महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील - पंकजा मुंडे

पुणे: महिला फुकट पैसे घेणारच नाहीत. त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील. महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान भुवया उंचावणारे ठरले आहे.

रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाच्या संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, 'द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे' उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, 'ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट'च्या संचालक शीतल आगाशे, 'एमएसएमई'चे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, जयंत भावे आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणाकडून काही उधार घेतले, मदत घेतली, तरी महिला ती परत करतातच. आम्ही ग्रामीण भागातील महिलांसाठी शून्य व्याजदराने कर्ज योजना राबविली होती. ९९.७० टक्के महिलांनी कर्ज नियमितपणे फेडले. अशी योजना शहरी बचत गटांसाठीही आणली पाहिजे. यासाठी मी पाठपुरावा करेन. महिलांकडे गुणवत्ता असली, तरी कुठल्याही क्षेत्रात झगडूनच त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागते. घरातील महिलेने काम करून उत्पन्न मिळवणे ही काळाची गरज झाली आहे. एकाच्या उत्पन्नावर घर चालू शकत नाही. ग्रामीण भाग असो वा शहरी, महिला घराची जबाबदारी सांभाळून कामही करतात. मात्र, अशावेळी आपला अहंकार बाजूला ठेवून महिलांना समान अधिकार का मिळत नाही, असा मला प्रश्न पडतो, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ देण्याच्या उद्देशानेच हे प्रदर्शन आयोजिण्यात आल्याचे प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Women don't want free money Give zero interest loans they will be able Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.