महिला, मुली असुरक्षित
By Admin | Published: April 8, 2015 03:47 AM2015-04-08T03:47:01+5:302015-04-08T03:51:18+5:30
फेब्रुवारीमध्ये लोणावळ्यात एका विवाह सोहळ्याच्या दिवशी हॉटेलमध्ये सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून खुनाची घटना घडली
संजय माने, पिंपरी
फेब्रुवारीमध्ये लोणावळ्यात एका विवाह सोहळ्याच्या दिवशी हॉटेलमध्ये सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून खुनाची घटना घडली. समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नागरिकांची आंदोलने झाली. पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. या घटनेनंतर अशा कृत्यांवर नियंत्रण येईल, असे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र मार्चअखेरपर्यंत सुरू राहिले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही अशा प्रकारची घटना घडली. चिंचवड, वाकड, पिंपरी, सांगवी आणि तळेगाव या ठिकाणी घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेबरोबर महिलांची छेडछाड, विनयभंग शहराच्या विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
महिलांवर आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मनोविकृत मानले जात असले, तरी विनयभंग आणि बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींमध्ये रखवालदार, घंटागाडी कर्मचारी ते हॉकीचा प्रशिक्षक अशा विविध स्तरातील व्यक्तींचा समावेश आहे. तर अत्याचाराच्या बळी ठरलेल्यांमध्ये चिमुरड्या बालिकेपासून ते गतिमंद मुलीचाही समावेश आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारातील बहुतांशी आरोपी हे अल्पवयीन आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयातील- १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून बलात्कार, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे घडतात, ही चिंतेची बाब ठरू लागली आहे.
अत्याचार करून लोणावळ्यात चिमुरडीचा खून करण्यात आला. पाठोपाठ १९ मार्चला तळेगाव दाभाडे येथे १५ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग करण्याची घटना घडली. तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. त्यांनतर २३ मार्चला निगडीत विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी होती. २४ मार्चला वाकड येथे ८ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. या घटना ताज्या असतानाच, २६ मार्चला १८ वर्षांच्या गतिमंद मुलीवर बलात्कार झाला. त्यातील आरोपीसुद्धा अल्पवयीन असल्याचे आढळून आले.
३० मार्चला चिंचवड येथील १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असताना, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निराधारनगर येथील नऊ वर्षांच्या बालिकेला टीव्ही पाहण्यासाठी घरात बोलावून महापालिकेत घंटागाडी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला. याशिवाय महिलांच्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांचीही विविध पोलीस ठाण्यांत नोंद झाली आहे.