महिलेला चक्क स्कूटर मिळाली बदलून; ग्राहकाने मिळविला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:58 PM2021-02-22T19:58:35+5:302021-02-22T19:59:19+5:30
ग्राहक पंचायतीकडे जाताच मिळाली नवीन दुचाकी
- विशाल शिर्के
पिंपरी : साधी डाळ खराब निघाली तरी दुकानदार ती बदलून देताना खळखळ करतो. मग, एखादी स्कूटरच खराब निघाली तर? ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या लढ्यामुळे अवघ्या चार ते पाच महिन्यांत महिलेला चक्क नादुरुस्त स्कूटरच्या बदल्यात नवी कोरी स्कूटर मिळाली. इतकेच नाही तर, घेतलेल्या स्कूटरच्या पुढील श्रेणीतील वाहन कोणताही नवा पैसा न भरता मिळाले.
औंधमधील डीपी रस्त्याजवळ राहणाऱ्या सुरेखा तापडिया यांनी चिकाटीने लढा देत आपला हक्क मिळविला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर म्हणाले, एखाद्या कंपनीने दिलेले उत्पादन खराब निघाल्यास ते बदलून घेण्याचा ग्राहकांना हक्क आहे. केवळ कॉलसेंटरला कळवून उपयोगाचे नाही. कंपनीशी लेखी अथवा ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करावा. रजिस्टर पत्राची एक प्रत आपल्याकडे ठेवावी. तसेच, पत्रव्यवहार करताना संबंधित अडचण ठराविक मुदतीत मार्गी काढण्याची मागणी करावी. तरच, त्याला काहीसा अर्थ राहील.
------------
डेक्कन येथील एका वितरकाकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. तीन महिने चालल्यानंतर गाडी वारंवार बिघडू लागली. काही वेळा दुरुस्ती केली. मात्र, वारंवार बॅटरीचा त्रास सुरू झाला. शेवटी संबंधित कंपनीला फोन केला. मात्र, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. आपण फसविले गेल्याची भावना निर्माण झाली. एका परिचिताने ग्राहक पंचायतीकडे तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार ग्राहक पंचायतीकडे तक्रार केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कंपनीकडे पत्रव्यवहार केला. कंपनी व्यवस्थापन, संबंधित वितरकाशी बोलणी केल्यानंतर चार ते पाच महिन्यांत कंपनीने त्यांची पुढील श्रेणीतील स्कूटर बदलून दिली.
- सुरेखा तापडिया, ग्राहक
---
वाहन खरेदी आणि देखभाल दुरुस्ती करताना घ्या काळजी
वाहन खरेदी करताना त्यातील बॅटरीची गॅरंटी-वॉरंटी (वस्तूचा हमी कालावधी), वाहनाची गॅरंटी आणि वॉरंटी पाहावी. बॅटरी आणि वाहन उत्पादनाची तारीख पाहावी. देखभाल दुरुस्तीला वाहन सोडल्यानंतर चांगली बॅटरी काढून घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती केल्यानंतर त्यावर बॅटरीचा क्रमांक नोंदविला की नाही, ते पाहावे. तसेच महत्त्वाचे सुटे भाग बदलले नसल्याची खात्री करावी, असे विजय सागर यांनी सांगितले.