हवेली तहसिलदार कार्यालयातील महिला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:41 PM2021-02-12T17:41:57+5:302021-02-12T17:42:06+5:30
बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी भोसले यांनी त्यांच्याकडे २५ हजार रूपयेची लाच मागितली होती.
लोणी काळभोर : जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी हवेली तहसिलदार कार्यालयातील अभिलेख कक्षातील महिला कोतवाल १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडली आहे. यामुळे हवेली तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बालेवाडी ( पुणे ) येथील अभिलेख कक्षातील कोतवाल सुवर्णा कटर भोसले ( वय ३४ ) यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे राजेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जमिनीची यांचे बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी भोसले यांनी त्यांच्याकडे २५ हजार रूपयेची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये व १ गुंठा जागेची मागणी करून १५ हजार रूपये लाच स्विकारली.
तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली असता भोसले यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आज सापळा रचून सुवर्णा भोसले यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार खडक पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. पुणे युनिट अलका सरग या करत आहेत.