Women's Health : महिलांनो सावधान...! पीसीओडी/ पीसीओएसचे वेळीच उपचार घ्या, अन्यथा वंध्यत्वाचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 02:14 PM2024-11-26T14:14:34+5:302024-11-26T14:19:00+5:30
Women Health : १६ ते २० वयोगटातील मुलींमध्ये पीसीओडी/ पीसीओएसचे प्रमाण अधिक
पुणे : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज (पीसीओडी) आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या विकारांचे प्रमाण महाविद्यालयीन तरुणींमध्ये झपाट्याने वाढत आहे. विशेषतः १६ ते २० वयोगटातील मुली तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हे विकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. वेळीच उपचार न घेतल्यास भविष्यात वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.
सध्या तरुणींसह महिलांमध्येपीसीओडी / पीसीओएस या गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. दैनंदिन जीवनशैलीतील होत असलेल्या बदलामुळे पीसीओडी/ पीसीओएस वाढतच चालला आहे त्यासोबतच विशेष रात्रपाळीत काम करत असलेल्या महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएसची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
पुण्यात पीसीओडी, पीसीओएस विकाराची संख्या एकंदरित स्थितीनुसार ९ टक्के ते २२ टक्क्यांपर्यंत आहे. दर ५० मुलीमागे दहा मुलींमध्ये पीसीओडी, पीसीओएसची लक्षणे आढळत आहेत, ज्यामध्ये शहरी भागातील प्रमाण तुलनेत अधिक आहे. पुणे शहरातील स्त्रियांची बदलती जीवनशैली तसेच मानसिक ताणतणाव आणि स्थूलतेमुळे पीसीओडी, पीसीओएसच्या विकाराच्या केसेस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात आयव्हीएफच्या उपचाराची मागणीदेखील वाढल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.
-लक्षणे
* वंध्यत्वाशी संबंधित हार्मोनल असमतोलामुळे त्वचेवर मुरूम, चेहऱ्यावर किंवा शरीरावर अधिक केस येणे
* योनी भागात सतत वेदना असणे.
* लैंगिक संबंधांमध्ये वेदना होणे.
*वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे.
* केस गळणे किंवा त्वचेमध्ये बदल होणे.
* थकवा, नैराश्य किंवा मूड स्विंग्स होणे.
* पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव किंवा खूप कमी रक्तस्राव हाेणे.
* पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओस), थायरॉईड विकार किंवा प्रोलॅक्टिनचे असंतुलन असणे.
साधारण महाविद्यालयीन मुली बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करतात, ज्यामुळे शरीरावर विशेष काही परिणाम होत असतात. त्यासोबतच ताण, अनियमित झोप या सगळ्यांमुळेसुद्धा आरोग्यावर परिणाम होत असतो. मासिक पाळीची समस्या अधिक काळापासून असेल तर मुलींमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढू शकते. महिलांनी दररोज ४५ मिनिटे व्यायाम न चुकता केलाच पाहिजे.
- योगेश गाडेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ