महिला हेल्पलाइन; पोलीस अनभिज्ञ
By Admin | Published: November 25, 2015 12:55 AM2015-11-25T00:55:36+5:302015-11-25T00:55:36+5:30
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाइन सुरु केली आहे. मात्र, ही हेल्पलाइन बंद करून नव्याने १०९१ ही हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती नसल्याने महिलांना उपयोग होत नाही.
पिंपरी : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाइन सुरु केली आहे. मात्र, ही हेल्पलाइन बंद करून नव्याने १०९१ ही हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती नसल्याने महिलांना उपयोग होत नाही. पोलीसही याबाबत अनभिज्ञ असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आला आहे.
पिंपरी : महिलांचे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यानंतर १०३ ऐवजी १०९१ ही हेल्पलाईन सुरू केली. या दोन्ही हेल्पलाईन कुचकामी ठरल्या आहेत.
या हेल्पलाईनवर गेल्या वर्षभरात किती तक्रारी नोंदविल्या गेल्या या बद्दल पिंपरी पोलिस ठाण्याला संपर्क साधल्यावर त्यांनी संकटात सापडलेल्या महिलेच्या मदतीसाठी किंवा इतर कुठल्याही मदतीसाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. १०३ किंवा १०९१ या हेल्पलाईन विषयी आम्हाला माहिती नसल्याचे उत्तर दिले. अडचणीत असल्यावर महिलेने इतर कुठल्याही नंबरवर संपर्क न साधता १०० या क्रमांकावर संपर्क साधवा. पोलीस मदत मिळू शकेल. असे ठाणे अंमलदारांनी सांगितले. वर्षभरात आतापर्यंत ४५ छेडछाडीच्या घटनांची नोंद आहे.
तसेच निगडी पोलिस टाण्यातील ठाणे अंमलदाराला याबाबत संपर्क साधाला असता,त्यांनी त्यांनी १०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे उत्तर दिले. त्यानंतर शासनाने सुरु केलेल्या १०३, व १०९१ या क्रमांकावर संपर्क साधल्यावर मदत मिळत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर ठाणे अंमलदाराने १०३, व १०९१ असा कुठल्याही हेल्पलाईन नंबर नसून, १०८ हा हेल्पलाईन क्रमांक असल्याचे सांगितले. शासनाने महिलांना तात्काळ मदतीसाठी १०८ नंबर सुरु केला असल्याचे सांगितले. १०८ हा क्रमांक हा शासनाने अपघाताच्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका पोहचावी,यासाठी सुरु केलेली हेल्पलाईन असताना ठाणे अंमलदाराने चक्क वैद्यकीय सेवेचा हेल्पलाईन नंबर दिला. तसेच १०८ लावण्यापेक्षा १०० या क्रमांकावरच महिलांनी संपर्क साधावा.
त्याच्या मदतीसाठी त्या ठिकाणी ताबडतोब बीट मार्शल येऊन महिलेला मदत करत असल्याचेही सांगितले. दरम्यान निगडी
पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०१५ ते आॅक्टोबर अखेर महिला छेडछाडीच्या ३७ घटना दाखल झाल्या असल्याचे सांगितले.
एकदंरीत पाहता ज्याच्यांकडून माहितीची अपेक्षा करायची, त्यानांच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या १०३ व १०९२ हेल्पलाईनची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय अत्याचारविरोधी दिन म्हणून २५ नोव्हेंबर हा दिन ओळखला जातो. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. हा क्रमांक सुरू आहे का, हे तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांतून लोकमत टीमने माहिती घेतली. संकटात सापडलेल्या महिलांना तातडीची मदत देण्यासाठी उपलब्ध करून दिलेली हेल्पलाइन सुविधा एकाही पोलीस ठाण्यात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
तक्रार देताच १० मिनिटांत पोलीस हजर
‘लोकमत’ कार्यालयातून महिला प्रतिनिधीने १०९१ या क्रमांकावर संपर्क साधला. पिंपरीतील चित्रपटगृहाजवळ तरुणीची छेडछाड काढली जात असल्याचे कळविले. संपर्क साधल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. असा एक अपवादात्मक चांगला अनुभव आला.
तक्रारकर्ती तरुणी : काही मुले एका मुलीची छेड काढत आहेत.
हेल्पलाईन १०९१ वरून महिला पोलीस : ठिकाण कोणते? किती मुले आहेत?
तक्रारकर्ती : पिंपरीतील विशाल टॉकीज परिसरात दोन-तीन मुले छेड काढत आहेत.
महिला पोलीस : ठीक आहे. पोलिसांना पाठवत आहे.
२ वाजून २२ मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस नाईक संतोष झेंडे आणि हवालदार नितीन सूर्यवंशी दहा मिनिटांत सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले.
पोलिसांच्या १०० या हेल्पलाईन क्रमांकावर अत्यंत तातडीक कारणासाठी पोलिसांशी मदत मिळविण्याकरिता संपर्क साधणे गरजेचे असताना अनेक नागरिक आपल्या अन्य व्यक्तिगत तक्रारींसाठी या क्रमांकावर संपर्क साधतात. त्यामुळे हा क्रमांक कायम व्यस्त राहतो. या हेल्पलाइन क्रमांकावर ताण येतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना वेळीच पोलिसांची मदत मिळत नाही.
लोकमतच्या कार्यालयातूनच वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधला. हवालदार वकडे यांनी फोन उचलला. त्यांना या हेल्पलाइनबद्दल विचारले असता ते म्हणाले, मला याबद्दल काही माहिती नाही. थांबा. मी विचारुन सांगतो. फोन सुरू ठेवूनच त्यांनी एक-दोन सहकाऱ्यांना याबाबत विचारले. त्यांच्याकडून काही माहिती दिल्यानंतर वकडे म्हणाले, वाकड पोलीस ठाण्यात अशी काही सुविधा नाही. हेल्पलाइन क्रमांक वगैरे नाही. जर तुमच्या हद्दीत महिलांवर अत्याचार होत असतील तर त्या महिला कोणाला मदत मागतात अथवा कोठे धाव घेतात, असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, त्या महिला १०० क्रमांकावर संपर्क साधतात. तो फोन कंट्रोल रूमला जोडला जातो. आम्हाला तेथून फोन आल्यावर मग आम्ही मदतीला धावतो. वाकड व सांगवी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, दोन्हीकडून अशी कोणतीही हेल्पलाइन नसल्याचे सांगण्यात आले.
सांगवी पोलीस ठाण्यात फोन लावला. तेथे झेंडे या कॉन्स्टेबल महिलेने फोन उचलला. त्यांनीही वाकड पोलिसांप्रमाणेच उत्तर दिले. त्या म्हणाल्या, पुण्यातील आयुक्त कार्यालयात अशी सुविधा उपलब्ध आहे. शहरातील पोलीस स्टेशनशी १०९१ या क्रमांकाची चौकशी करताना आढळले की पोलीसांना हा क्रमांकच माहित नाही. भोसरी पोलीस ठाण्यात गेले असता गणेश कारोडे पोलीस कर्मचाऱ्याने माहिती दिली, आमच्याकडे पोलीस चौकीत येऊन ज्या घटना नोंदविल्या जातात, त्याच घटनांची चौकशी होते. शिवाय एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना त्यांना हा क्रमांक माहित नसून ४ अंकी क्रमांक हा पोलीस हेल्पलाईन क्रमांक असूच शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून फोन देखील लावून पाहिला. फोन व्यस्त लागला. चिंचवड पोलीसांशी देखील संपर्क साधला असता, त्यांनाही क्रमांकाची माहिती नसल्याचे निदर्शनास आले.