महिला उद्योग धोरण महाराष्ट्रातच प्रथम; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:54 IST2023-10-30T11:54:03+5:302023-10-30T11:54:25+5:30
उद्योग, व्यापाराचे प्रश्न मार्गी लागतील, असे उदय सामंत म्हणाले.

महिला उद्योग धोरण महाराष्ट्रातच प्रथम; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महिला उद्योग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांसोबत परिषद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात दिली.
शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड ‘मायटेक्स एक्स्पो’ या प्रदर्शनाला डॉ. गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन उद्योजकांसोबत शनिवारी संवाद साधला. व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत येत्या ३० ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीबाबतही डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली.
‘उद्योग, व्यापाराचे प्रश्न मार्गी लागतील’
- आमचे सरकार शंभर टक्के उद्योजक, व्यापारी बंधूंसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच त्यांची मुंबईत आवश्यक त्या सर्व खात्याचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाणार आहे.
- या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.
- डायमंड ज्वेलरी पार्कसाठी मुंबईत २५ एकर जागा दिली आहे. उद्योग क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.