अपघातग्रस्त महिलेची पर्स लांबविणाऱ्या महिला पोलिसास तळेगाव दाभाडेत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:36 PM2018-02-01T14:36:23+5:302018-02-01T14:38:55+5:30
पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ तळेगाव दाभाडे पोलिसांनी या महिला पोलिसास अटक केली आहे़ स्वाती गुलाब जाधव असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़
याबाबतची माहिती अशी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोर बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता दोन दुचाकीत अपघात झाला़ त्यात ही महिला व तिचे वडिल किरकोळ जखमी झाले होते़ महिला पोलीस स्वाती जाधव यांनी त्यांना रुग्णालयात नेले़ त्यानंतर त्यांच्याकडून चावी घेऊन त्यांची दुचाकी पोलीस ठाण्यात लावली़ सायंकाळी ही महिला आपली दुचाकी घेण्यास पोलीस ठाण्यात आली़ तिने चावी घेऊन डिकी उघडली़ तर त्यात ५० हजार रुपये असलेली पर्स गायब झाल्याचे दिसून आले़ पोलीस ठाण्याच्या आवारातील दुचाकीमधून पर्स चोरीला गेल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली़ तेव्हा ती पर्स स्वाती जाधव यांच्याकडे असल्याचे दिसून आले़ परंतु, रात्र झाली असल्याने शेवटी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन महिला पोलीस स्वाती जाधव यांना रात्री उशिरा अटक केली आहे़ तिच्याकडून पर्स हस्तगत करण्यात आली आहे.