सुरेश पिंगळे आत्महत्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:48+5:302021-08-22T04:12:48+5:30
पुणे : चारित्र्य पडताळणीमध्ये उशीर झाल्याने सुरेश पिंगळे या नागरिकाने स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी ...
पुणे : चारित्र्य पडताळणीमध्ये उशीर झाल्याने सुरेश पिंगळे या नागरिकाने स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी खडकी पोलीस ठाण्यातील चारित्र्य पडताळणीचे काम करीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून निलंबित केले आहे. पोलीस शिपाई विद्या पोखरकर असे त्यांचे नाव आहे.
पोरखकर या खडकी पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. १ ते २२ जुलै २०२१ या कालावधीमध्ये चारित्र्य पडताळणीची जबाबदारी त्यांच्यावर होती. सुरेश पिंगळे यांचे चारित्र्य पडताळणी प्रकरणी चारित्र्य पडताळणी न करून देता त्यांना खडकी पोलीस स्टेशन येथे चकरा मारायला लावलेल्या तसेच त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्यांचे चारित्र्य पडताळणीचे व्हेरिफिकेशन करून दिलेले नाही. त्यांनी १ जुलै रोजी त्यांचे चारित्र्य पडताळणीचा अर्ज ऑनलाईन सादर केला होता. त्यानंतर हा अर्ज २२ जुलै रोजी पुढील कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय विशेष शाखा येथे पाठविला आहे. त्यादरम्यान त्यांनी सुरेश पिंगळे यांना तुमचे व्हेरिफिकेशन होणार नाही, तुमचा पत्ता चुकीचा आहे, तुम्ही पत्ता बदलून आणा, असे सांगून त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचे व्हेरिफिकेशन न झाल्याने कंपनीने त्यांना कामास येण्यास बंदी केली. त्याचा त्यांना मनस्ताप होऊन व इतर कारणावरून त्यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. यात महिला पोलीस कर्मचारी यांनी बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा करून कसुरी केलेली आहे. पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन व बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांना निलंबत करण्यात आले आहे, असे या आदेशात म्हटले आहे.