ग्राहकाच्या मोबाईलवरून पाठवला मेसेज अन् ‘ती’’ची झाली कुंटणखान्यातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 12:56 PM2021-03-06T12:56:00+5:302021-03-06T13:00:06+5:30
नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला पुण्यात आणले आणि देहविक्रय करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले.
पुणे : 'ती' मूळची पश्चिम बंगालची. एका व्यक्तीने पुण्यात नोकरी देतो असे आमिष दाखवून बुधवार पेठेमध्ये सोडून तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले. 2018 सालची ही घटना. एक वर्षानंतर एका ग्राहकामार्फत तिने आपल्या मुलाला मेसेज केला आणि पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर अखेर त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आयुष्य जगणाऱ्या 'ती'ची सुटका झाली. न्यायालयाने या पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.
45 वर्षीय महिला दोन मुलांची आई आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला पुण्यात आणले आणि देहविक्रय करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले.तिच्या एका ग्राहकाला तिने दु:ख सांगितले आणि त्यानेही माणुसकीच्या नात्याने तिच्या मुलाला मेसेज पाठविण्यास सहकार्य केले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर तिच्यासह एका महिलेची सुटका झाली. फरासखाना पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2020 मध्ये संबंधित व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबरमध्ये मुलगा पुण्यात आला आणि त्याने वकिलांमार्फत न्यायालयात आईच्या ताब्याकरिता न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर अॅड. पुष्कर दुर्गे आणि अॅड. तेजलक्ष्मी धोपावकर यांनी महिलेचा मुलगा तिची काळजी घेईल व परत ती अशा घटनेची बळी होणार नाही. याची खबरदारी घेईल. तसेच पीडित महिला न्यायालयात गरज पडेल तेव्हा साक्ष देण्यासाठी हजर राहील असे सांगून न्यायालयात पीडित महिला व मुलाची बाजू मांडली. मात्र पीडित महिला व तिचा मुलगा यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे बंगाली भाषेत असल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत अडसर निर्माण झाला. परंतु वकिलांनी दोघांची एलआयसी पॉलिसी न्यायालयात दाखल केली. ज्यामध्ये इंग्रजी भाषेत दोघांच्या नात्याबददल लिखित पुरावा होता असे अॅड. धोपावकर यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी(दि.2) पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------