उन्हाळी सुट्टीमुळे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग
By अजित घस्ते | Updated: April 19, 2025 20:48 IST2025-04-19T20:47:08+5:302025-04-19T20:48:48+5:30
- बटाटा वेफर्स, साबुदाणा, पापड, कुरड्या हे पदार्थ बनविण्यावर भर

उन्हाळी सुट्टीमुळे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग
पुणे : उन्हाळ्यात कडक उन्हाचा एकीकडे त्रास होत असतानाच दुसरीकडे उन्हाळी कामांनाही चालना मिळत आहे. कडक उन्हात घरातील अंथरूण-पांघरूण धुवून टाकणे, गाद्यांना ऊन दाखवणे, पापड-लोणचे बनवणे यांसारखी घरगुती कामे सुट्टीच्या दिवशी केली जात आहेत. उन्हाळी काम महिला आवर्जून करतात, ते म्हणजे वाळवणं करणे. उन्हाळ्यात बटाट्याचे, साबुदाण्याचे, कुरड्यांचे वाळवण, लोणचे, पापड व मसाले बनवण्याकडे शहरातील व उपनगरातील महिलांचा कल वाढत आहे.
महिलांकडून उन्हाळी सुट्टीचा वापर हा वाळवण पदार्थ बनवण्याकडे केला जात आहे. शहरात सोसायटीच्या गच्चीवर तर ग्रामीण भागात अंगणात हे पदार्थ महिला एकत्र येऊन करीत आहेत. त्यात मुलांना देखील उन्हाळी सुट्टीत घरगुती पदार्थ कसे बनवले जातात, ते शिकवले जात आहे. त्यामुळे खेळीमेळीत असे पदार्थ बनवण्याकडे कल वाढताना दिसून येत आहे. घरगुती तिखट मसाला बनविण्यासाठी कांडप केंद्रांवर गर्दी होत आहे.
असे आहेत दर प्रति किलोप्रमाणे :
गहू हातावरची शेवई : ६००
गहू कुरडई हाताची ४५०
गहू कुरडई मशीनची ३६०
रवा गहू मिक्स कुरडई - ३८०
खपली गहू कुरडई ४२०
साबुदाणा कुरडई पापड -३६०
बटाटा पापड - ३७०
उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवण्याची पूर्वीपासून आवड आहे. हा एक घरगुती व्यवसाय म्हणून देखील करता येतो. याला सोसायटीच्या महिलांकडून मागणी वाढत आहे. यामध्ये शेवया, पापड, सांडगे, कुरडई आदी वाळवणाचे पदार्थ बनवले जात आहेत.
- संजना वायदंडे, गृहिणी