महिला बचत बाजार आता ‘महापौर’ बचत बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:09 PM2017-10-07T16:09:09+5:302017-10-07T16:11:06+5:30
महिला बचत बाजार उपक्रमात महापौर मुक्ता टिळक यांनी बदल केला आहे. महापौर बचत बाजार असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.
पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणार्या महिला बचत बाजार उपक्रमात महापौर मुक्ता टिळक यांनी बदल केला आहे. महापौर बचत बाजार असे त्याचे नामकरण करण्यात आले असून शहरातील एकूण ७ ठिकाणी तो आयोजित करण्यात येईल व दिवाळीनंतरही पुढे दर शनिवार, रविवार तो भरत राहील.
महापौर टिळक यांनीच ही माहिती दिली. महापालिकेच्या राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात गेल्या काही वर्षात महिला बचत गटांची संख्या वाढली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी या उपक्रमाचे स्वरूप विस्तारले असल्याचे महापौर म्हणाल्या. एकूण ३०९ महिला बचत गट तसेच वैयक्तिक स्वरुपात व्यवसाय करणार्या अनेक महिलाही यात सहभागी होणार आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ११ ते १५ आॅक्टोबर दरम्यान बालगंधर्व रंगमदिर आवार, गणेश कला क्रीडा मंदिर, वडगाव शेरी, पु. ल. देशपांडे उद्यान, मेंगडे जलतरण तलाव, महिला आधार केंद्र बाणेर व तुळशीबागवाले कॉलनी या ७ ठिकाणी महिला बचत बाजार भरेल. त्यात सहभागी होणार्या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच यातील महिलांना महापालिकेच्या वतीने त्यांच्या वस्तुंचे पॅकेजिंग कसे करायचे, मार्केटिंग कसे करायचे याचे प्रशिक्षणही नंतर दिले जाणार आहे अशी माहिती महापौरांनी दिली. पुढील काळातही हे बाजार सुरू राहतील, त्यांची संख्याही वाढवली जाईल असे त्यांनी सांगितले.