महिला सुरक्षा समित्या स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:16 AM2018-08-24T03:16:14+5:302018-08-24T03:16:38+5:30

प्रत्येक शाळा- महाविद्यालयांत विद्यार्थी समिती तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

The women security committees will be set up | महिला सुरक्षा समित्या स्थापन करणार

महिला सुरक्षा समित्या स्थापन करणार

googlenewsNext

पुणे : महिला, विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा होणार त्रास लक्षात घेऊन सर्व गावांमध्ये महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात येणार असून, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनींशी महिला पोलीस संपर्कात राहणार आहे़ प्रत्येक शाळा- महाविद्यालयांत विद्यार्थी समिती तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
बारामतीमधील झारगडवाडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली़ बुधवारी तिचे उपचार सुरू असतानो निधन झाले होते़ याविषयी संदीप पाटील यांनी सांगितले की, महिला, विद्यार्थिनींची सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न आहे़ जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात येणार आहे; तसेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी समिती तयार करण्यात येईल़ संबंधित पोलीस ठाण्यातील प्रमुख पोलीस अधिकारी दर महिन्याला या समित्यांच्या बैठका घेतील़ ग्रामीण पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सर्व विद्यार्थिनींना देण्यात येतील़ इतरांकडून होणाºया त्रासाविषयी या विद्यार्थिनी महिला पोलीस कर्मचाºयांशी अधिक खुल्या प्रमाणात बोलू शकतील़ त्यायोगे अशा घटनांना वेळीच पायबंद घालणे शक्य होऊ शकेल, या हेतूने ही योजना राबविण्यात येणार आहे.

बारामती, इंदापूरला विशेष पथक नेमणार
सांगवी : निर्भया पथकाचे कामकाज प्रगतिपथावर आहे. मुलींच्या तक्रारींंची वेळीच दक्षता घेत आहेत. बारामती विभागाच्या पथकाने दोन वर्षांत रोडरोमिओंवर चांगली कारवाई केली आहे. आता या पथकाबरोबर आणखी विशेष पथक नेमणार असल्याची माहिती बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत दिली.
‘लोकमत’ने गुरुवारी रोडरोमिआेंवर कारवाईची गरज असल्याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. याची दखल घेऊन आज या विशेष पथकाची घोषणा केली. अधिक माहिती देताना शिरगावकर यांनी सांगितले की, बारामती, इंदापूर तालुक्यांतील एकूण ९५ शाळा महाविद्यालयांत जाऊन निर्भया पथकाने मुलींच्यात छेडछाडविषयक जनजागृती केली आहे. वारंवार ज्या कुटुंबातील महिलांची घरगुती भांडणे झाली आहेत, अशा एकूण ४१२ महिला व त्यांच्या पतींचे समुपदेशन करून त्यांचा संसार वाचवला आहे.
निर्भया पथकाबरोबरच विशेष पथक नेमण्यात येणार आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरील महाविद्यालय परिसर व चौकात डिजिटल बोर्ड लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करण्यात आली आहे. या डिजिटल बोर्डवर मुलींच्या छेडछाडीसारख्या प्रकरणासंबंधी निर्भया पथक व पोलिसांचे मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहेत.

१२00 हून अधिक रोमिओंवर कारवाई
आजवर निर्भया पथकाने १२०० हून अधिक रोमिओंवर कारवाई केली आहे. जानेवारी २०१८ ते आजअखेर ४११ जणांवर कारवाई केली आहे. सध्या बारामती विभागात एकूण २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचारी कार्यरत आहेत. निर्भयाप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघ, महिला पोलीस नाईक माधुरी लडकत, महिला पोलीस नाईक अमृता भोईटे, अर्चना बनसोडे या कार्यरत आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी हे अधिकारी, कर्मचारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुलींनी झगडले पाहिजे. वेळीच आपण पोलिसांना खबर देणे गरजेचे आहे. अनेक गोष्टी मुली मनात दाबून ठेवून नैराश्याची भूमिका धारण करतात.
यामुळे मुली भविष्यात कोणती पावले उचलतील याचा नेम राहिलेला नाही. म्हणून वेळेत मुलींनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करून निर्भीड जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.

Web Title: The women security committees will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला