लग्नातही चोरट्यांचा वावर! वधूपक्षाकडील सात लाखांचा ऐवज केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 03:12 PM2021-11-21T15:12:42+5:302021-11-21T15:13:57+5:30
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून तपस सुरु आहे
पुणे : विवाह समारंभात वधू पक्षाकडील सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना खराडी भागातील एका तारांकित हाॅटेलमध्ये घडली. याप्रकरणी रणजीत प्रसाद (वय ५६, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रसाद यांच्या मुलीचा विवाह समारंभ खराडी बाह्यवळण मार्गावरील रॅडीसन हाॅटेलमध्ये १९ नाेव्हेबर रोजी होता. प्रसाद यांच्या पत्नीने रात्री साडेनऊच्या सुमारास सभागृहातील खुर्चीवर पर्स ठेवली होती. त्यात सोन्याचे दागिने, रोकड, चांदीच्या वस्तू असा ६ लाख ९६ हजारांचा ऐवज ठेवला होता. समारंभात त्या सहभागी झाल्या असताना त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने ऐवज असलेली पर्स लांबविली.
काही वेळानंतर प्रसाद यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. प्रसाद दाम्पत्याने पोलिसांकडे फिर्याद दिली. तारांकित हाॅटेलमधील सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करत आहेत.