महिलांनी नेतृत्वाचा अधिकार गाजवावा : शरद पवार; पुण्यात महिला लोकप्रतिनिधी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:03 PM2018-02-22T17:03:24+5:302018-02-22T17:10:15+5:30
महिलांनी केवळ नावापुरते न राहता स्वत: निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींना नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरूवारी येथे व्यक्त केले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील १४०७ पैकी ६९७ ग्रामपंचायतींत महिला सरपंच, तर १३ तालुक्यातील १५० गणातील निम्म्या गणात पंचायत समिती सदस्य, तर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास ४० महिला नेतृत्व करत आहेत. महिलांनी केवळ नावापुरते न राहता स्वत: निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींना नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरूवारी येथे व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील महिला लोकप्रतिनिधीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, कृषी सभापती सुजाता पवार, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की संधी दिल्यास महिला सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेत आहे. सध्या प्रत्येक कुटुंबाचे घर हे महिलांच्या नियोजनामुळेच सुरू आहे. त्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रात सन्मानाची वागणूक मिळायला हवी. प्रत्येक महिलेला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेत महिलांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत देखील कृषी, समाजकल्याण आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी महिला आहेत. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी देखील महिला भगिनी असायला हवी.
समाजात काही ठिकाणी स्त्रीयांच्या हक्कावर गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्याला आत्मविश्वासाने प्रतिकार करा. यश तुमचेच आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये महिलांचा निम्मा वाटा आहे. भारताच्या तीनही दलात महिला अधिकारी चांगले काम करत आहेत. बॅँकिंग सेक्टरमध्ये महिला चांगले काम करत आहेत, असेही या वेळी शरद पवार म्हणाले.
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील व राणी पाटील यांनी लोकसहभागातून कामे कशी करायची तसेच प्रस्ताव कसे तयार करायचे याबाबत मार्गदर्शन केले. तर अशोक देशमुख आणि इंद्रजित देशमुख यांनी पंचायराज व्यवस्थेत काम करताना प्रशासनाकडून कसे काम करवून घ्यायचे याविषयी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ६९७ महिला सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्या, ७० महिला पंचायत समिती सदस्या आणि ४० जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या अशा जवळपास १२०० महिला लोकप्रतिनिधी याप्रसंगी कार्यशाळेला उपस्थित होत्या.
जमिनीच्या क्षेत्रात झपाट्याने घट; शेतीला जोडधंदा हवाच
जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. परंतू, जमिनीवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या संख्या मात्र वाढत आहे. सध्या केवळ शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा प्रत्येकाने केला पाहिजे. तरच शेतीला उर्जितावस्था येईल. तसेच गावातील प्रत्येक मूल शाळेत जाण्यासाठी, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आणि गावाचे अर्थकारण मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिला लोकप्रतिनिधिंनी प्रयत्न करायला पाहिजे. गावाला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे तसेच चुकीच्या कामांना नाही म्हणता आले पाहिजे. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न सातत्याने ठेवले पाहिजेत, असे आवाहन शरद पवार यांनी याप्रसंगी केले.
शरद पवार यांच्य धोरणामुळेच महिलांना ५० आरक्षण मिळाले आहे. आज होत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात चांगल्या गोष्टीं घेऊन प्रत्येकाने स्थानिक पातळीवर आपल्या गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच आदर्श सरपंच पुरस्काराच्या धर्तीवर पुढील काळात आदर्श ग्रामपंचायत सदस्यांना देखील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे