महिलांना समान वागणूक मिळावी
By admin | Published: April 24, 2017 05:11 AM2017-04-24T05:11:59+5:302017-04-24T05:11:59+5:30
कौटुंबिक हिंसाचार आणि महिला सरंक्षण कायदा याचा समाजाला नक्कीच फायदा होईल, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.
पुणे : कौटुंबिक हिंसाचार आणि महिला सरंक्षण कायदा याचा समाजाला नक्कीच फायदा होईल, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. महिलांना समान वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदतर्फे रविवारी आयोजिलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पुणे मराठी ग्रंथालयात ही कार्यशाळा झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक, पश्चिम अधिवक्ता परिषद अध्यक्ष एम. पी. बेंद्रे, उपाध्यक्ष एस. के. जैन, भारतीय स्त्रीशक्ती जागरण अध्यक्ष अश्विनी बर्वे, सी. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
रहाटकर म्हणाल्या, मुलींना समान वागणूक देणे फार गरजेचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. गुन्हे दाखल होतात. पण त्या गुन्ह्यांचा निकाल लवकर लागत नाही. कायदा असूनही त्याचा काही उपयोग होत नाही असे महिलांना वाटले तर कायद्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने संस्थेने काही कार्यक्रम हाती घेतले तर महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. (प्रतिनिधी)