हिमालयातील गंगोत्री शिखरावर महिलांनी यशस्वी चढाई करत फडकवला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:21 PM2021-10-04T16:21:17+5:302021-10-04T16:21:50+5:30
सलग २५ दिवसांच्या मोहिमेत अतिशय खडतर आव्हाने पार पाडली
पुणे : गढवाल हिमालयातील गंगोत्री-१ या अत्यंत कठीण शिखरावर गिरिप्रेमीच्या पूर्वा शिंदे (सिंह ) आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा २९ सप्टेंबरला फडकवला. गंगोत्री शिखर समूहात गंगोत्री-१, गंगोत्री-२ आणि गंगोत्री-३ या शिखरांचा समावेश होतो. त्यापैकी गंगोत्री-१ हे सर्वात उंच आहे. चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमधे गणले जाते. या शिखरावर गिरीप्रेमीचा संघाने चार सप्टेंबरपासूनच्या सलग २५ दिवस चाललेल्या या मोहिमेत अतिशय खडतर आव्हाने पार केली.
या मोहिमेमध्ये पूर्वा शिंदे (सिंह) हिच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनिता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता. गिरीप्रेमीने दोन वर्षांपूर्वी महिला गिर्यारोहकांच्या संघाची उभारणी करण्याकरिता सुरू केलेल्या गुरुकुल या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील १५ महिला सराव करत होत्या आणि त्यातून महिलांचे दोन संघ तयार झाले. त्यापैकी जुलै - ऑगस्टमधील कांग्यत्से १ आणि २ या यशस्वी शिखर मोहिमेनंतर या दुसऱ्या महिला संघाने लगेचच तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड अशा शिखरावर मोहीम यशस्वी केली. शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे या संघाला मार्गदर्शन मिळाले.
''कोरोना काळामध्ये गिरिप्रेमीने सुरू केलेल्या गुरुकुल या संकल्पनेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमधून महिला गिर्यारोहकांनी सहभाग घेतला. सलग दोन वर्षे केलेल्या शारीरिक आणि मानसिक तयारी मुळेच कांग्यात्से व गंगोत्री या दोन शिखर मोहिमा यशस्वी झाल्या. या गुरुकुलचा प्रशिक्षक समिरन कोल्हे यानेही संघाची खूप चांगली तयारी करून घेतली असे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले.''