पती आणि पतीच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर बदनामी; शिक्षिकेने गळफास घेत संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:08 PM2021-08-07T21:08:03+5:302021-08-07T21:09:48+5:30
गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात करत तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले.
पुणे : पती व पतीच्या मैत्रिणीकडून सतत होणार्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून खासगी शाळेत काम करणार्या शिक्षिका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली नितीन गायकवाड (वय ३३, रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन वसंत गायकवाड (वय ३६) व त्याची मैत्रीण या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहितेचे वडील मारुती यशवंत चव्हाण (वय ६२, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे २०१८ ते १८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली व नितीन यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या एका खासगी शाळेत नोकरी करत होत्या, तर पती हा ठेकदारीची कामे करतो. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले. त्याद्वारे दिपाली यांच्या नातेवाईक व मैत्रिणी यांना अश्लील व घाणेरड्या कमेंट केल्या व त्यांची बदनामी केली. तर, तू मरुन जा, तुला कुठेच आम्ही दोघे जगू देणार नाही, तू स्वत:हून जीव देशील, असे बोलून संशय घेत शिवीगाळ करून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून दिपाली यांनी राहत्या घरात सप्टेंबर २०२० मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दिपाली यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. पण, ते कोरोनामुळे परत आले नाहीत. नुकतेच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली़