लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत ‘वूमेन वॉरिअर्स’ ऑन ड्यूटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:26+5:302021-06-03T04:08:26+5:30
पुणे : पोलीस दलात काम करायचे म्हणजे दिवसा-रात्री ड्यूटी करावी लागणार, हे या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच माहिती असते. त्यादृष्टीने ...
पुणे : पोलीस दलात काम करायचे म्हणजे दिवसा-रात्री ड्यूटी करावी लागणार, हे या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच माहिती असते. त्यादृष्टीने महिलांना तयारी ठेवावी लागते. तशी तयारी बहुतेक महिलांची सुरुवातीपासून असते. मात्र, कोरोना विषाणू सभोवताली फिरत असताना रस्त्यावर रात्री-अपरात्री ड्यूटी केल्यानंतर पुन्हा घर आणि मुलांचे सांभाळण्याची तारेवरची कसरत पुरुषांपेक्षा महिलांना खूपच अडचणीची ठरली होती. त्यावर शहरातील पोलीस महिला अधिकारी आणि कर्मचारी निर्धाराने सामोऱ्या गेल्या.
पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या मुलापासून किंवा घरात एका बाजूला राहत, ड्यूटी करणे शक्य होत असते. बाहेरच्या खोलीत, प्रसंगी व्हरांड्यात बिछाना टाकता येतो. मात्र, महिला कर्मचाऱ्यांना ते शक्य नसते. मुलांचे करणे, स्वयंपाक करण्याबरोबरच इतर कामे करावीच लागतात. त्यामुळे रस्त्यावर बंदोबस्त करत असताना त्यातून वेळ काढून मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांची खबरबात घ्यावी लागत असते. रात्री ड्यूटीवर असताना मुले जेवली का ? झोपली का? हे पाहावे लागते. सध्याच्या ‘हम दो हमारे एक और दोन’ काळात रात्रीची ड्यूटी ही अनेकदा चिंता करावी अशी परिस्थिती येते. पहिल्या लॉकडाऊनच्यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना गावी पाठवून दिले होते. आता मात्र गावाकडेही कोरोनाचे रुग्ण असल्याने तिकडे पाठविणे शक्य झाले नाही. त्यामुळे या काळात महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी कामगिरीबरोबरच अतिशय काळजी घेऊन काम करावे लागत आहे. घरी आल्यावर मग ती वेळ कधीची असो. सरळ बाथरुममध्ये जाऊन अंघोळ करून मगच घरात इतर वस्तूंना हात लावण्याची आता सवय करुन घ्यावी लागली आहे.
.....
एकूण पोलीस अधिकारी - ७४४
महिला पोलीस अधिकारी - २३३
एकूण पोलीस अंमलदार - ७९००
महिला पोलीस अंमलदार - १९१३
........
कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच कर्तव्याला देखील प्राधान्य द्यावे लागते. लहान मुले घरी असल्यामुळे त्यांच्यात जीव अडकतो. बाहेरून आल्यानंतर घरात जाताना थोडी धास्ती वाटते. कर्तव्यादरम्यान अनेकांसोबत आपला संपर्क येत असतो. पण, आता सवय झाली आहे. व्यवस्थित काळजी घेतो, त्यामुळे कोरोनाची भीती वाटत नाही.
महिला पोलिस कर्मचारी वाहतूक शाखा
.......
रात्री उशिरापर्यंत नाकाबंदीच्या ठिकाणी काम करावे लागते. कोरोना संसर्गाचा धोका आहेच. मात्र लस घेतल्यामुळे व कोरोना नियमाचे पालन करत असल्यामुळे भीती वाटत नाही. घरी लहान मुले असल्यामुळे जास्त काळजी घेतो. घरी गेल्यानंतर आंघोळ करूनच मुलांना जवळ घेतो.
महिला पोलीस कर्मचारी
.......
पहिल्या लाटेच्यावेळी मुलांना गावी सोडले होते. मात्र, गावी देखील कोरोना असल्यामुळे यावेळी मुले जवळच आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. शेवटी कुटुंबाला सांभाळण्याबरोबरच कर्तव्यदेखील महत्त्वाचे आहे.
महिला पोलीस कर्मचारी
....