फेसबुकवरील बदनामीने वैतागल्या महिला

By admin | Published: November 4, 2014 03:46 AM2014-11-04T03:46:32+5:302014-11-04T03:46:32+5:30

मानसिक त्रास व्हावा म्हणून तिच्याच ग्रुपमधील एका तरुणाने फेसबुकवर तिच्या नावाने अकाऊंट उघडून त्यावर अश्लील छायाचित्रे आणि मजकूर टाकला.

The women who are scared of defamation on Facebook | फेसबुकवरील बदनामीने वैतागल्या महिला

फेसबुकवरील बदनामीने वैतागल्या महिला

Next

पुणे : वाणिज्य महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाला शिकणा-या एका मुलीला मानसिक त्रास व्हावा म्हणून तिच्याच ग्रुपमधील एका तरुणाने फेसबुकवर तिच्या नावाने अकाऊंट उघडून त्यावर अश्लील छायाचित्रे आणि मजकूर टाकला. तसेच त्या मुलीचा मोबाईल क्रमांक टाकला. या सर्व प्रकारामुळे मुलीला रात्री-अपरात्री अश्लील फोन येऊ लागले. या प्रकाराची तिने सायबर शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी या आरोपीला शोधून काढल्यावर मात्र हा आपलाच मित्र असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तेव्हा त्या मुलीने गुन्हा दाखल करायला नकार दिला.
अशा एक ना अनेक तक्रारी पुणे शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे येत आहेत. गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियावरून होणाऱ्या बदनामीच्या विशेषत: महिलांच्या बाबतीत तक्रारींचे प्रमाण वाढत चालले आहे. महाविद्यालयीन तरुणांपासून ते कौटुंबिक वादातूनही अनेक जण महिलांना मानसिक त्रास देण्याकरिता, त्यांची बदनामी करण्याकरिता फेसबुकचा वापर करीत आहेत. सध्या इंटरनेटवरील वापरात असलेल्या सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये फेसबुक सर्वाधिक वापरले जाते. कोणतीही ‘केवायसी’ पॉलिसी (नो युवर कस्टमर) नसतानाही फेसबुकवर बनावट नावाने अकाऊंट उघडता येते. अकाऊंट उघडताना लागणारा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी न करता हे खाते काही क्षणातच उघडले जाते.
कोणत्याही अडथळ्यांशिवाय महिलांची बदनामी करण्याची ही सोपी पद्धत असल्यामुळे अनेक जण त्याचा वापर करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी तर पतीनेच स्वत:च्या पत्नीचे अश्लील प्रोफाईल तयार करुन फेसबुकवर तिचा मोबाईल क्रमांक टाकल्याची माहिती उजेडात आली होती. बऱ्याचदा ओळखीच्यांकडूनच अशी कृत्ये केली जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. इंटरनेटवरील अश्लील फोटोंना महिलांचा चेहरा जोडून ही छायाचित्रे फेसबुकवर टाकली जातात. विकृतांच्या या कृत्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सायबर शाखेकडे आलेल्या तक्रारींचा पोलिसांकडून तपास होतो. परंतु जेव्हा आरोपी आपल्याच नात्यातील आहे किंवा मित्र आहे हे समजल्यावर अनेकदा महिला गुन्हा दाखल करायला तयार होत नाहीत.
हा विषय तेथेच थांबवण्यात येतो. त्यामुळे पोलिसांचेही कष्ट वाया जातात. महिलांच्या अशा बदनामीमध्ये केवळ पुरुषच आरोपी आहेत असे नाही तर महिला आरोपींकडूनही असे प्रकार घडतात.(प्रतिनिधी)

Web Title: The women who are scared of defamation on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.