घरकाम करणार्या महिलेने पळविली चक्क तिजोरी; दागिन्यांसह २५ लाखांचा ऐवज लंपास; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 04:52 PM2021-08-07T16:52:15+5:302021-08-07T16:52:41+5:30
घरकाम करणार्या महिलेने काम करत असलेल्या घरातील चक्क इलेक्ट्रॉनिक तिजोरीच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : रात्री अपरात्री येऊन चोरटे एटीएमचे मशीन, बँकांमधील तिजोरी चोरुन नेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. मात्र, घरकाम करणार्या महिलेने काम करत असलेल्या घरातील चक्क इलेक्ट्रॉनिक तिजोरीच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी जयश्री (रा. वानवडी) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ७६ वर्षाच्या वृद्धाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांच्या पत्नी कोंढवा भागातील कमेला परिसरातील गुलमोहर सोसायटीत राहतात. फिर्यादी हे परदेशात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात रहायला आले आहेत़. घरात दोघेच जण असतात. २७ जुलै रोजी एक महिला त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती. त्यांनाही घरकामासाठी महिलेची आवश्यकता असल्याने तिला कामाला ठेवून घेतले. मात्र, तिला कामाला ठेवून घेताना त्यांनी तिची काहीही माहिती घेतली नव्हती. शिवाय मोबाईल नंबरही घेतला नाही. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांना तिचे काम चांगले वाटले. ३० जुलैला दुपारी चार वाजता ती काम करुन निघून गेली. त्यानंतर दुसर्या दिवशी ३१ जुलै रोजी परत कामाला आलीच नाही. त्यांनी वाट पाहिली पण, तिच्याशी संपर्क साधण्यासाठी तिच्याविषयी काहीही माहिती त्यांच्याकडे नव्हती.
फिर्यादी यांच्या पत्नी शुक्रवारी तिजोरीत दागिने ठेवण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना तिजोरी जागेवर आढळून आली नाही. त्यांच्या या तिजोरीला बायोमेट्रिक कुलूप आहे. तिजोरीत ५३२ ग्रॅम वजनाचे २४ लाख २३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, ५०० अमेरिकन डॉलर, ४ हजार दुबई दिनार असे परदेशी चलन व १० हजार रुपयांची तिजोरी असा २४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
घरात काम करताना तिने संपूर्ण वेळ मास्क वापरला असल्याने फिर्यादी यांनी तिचा चेहरा पाहिला नव्हता. तीन दिवस काम करुन तिने एका वयोवृद्ध कुटुंबाला आपला हिसका दाखविला. तिजोरी उघडता न आल्याने तिने अख्खी तिजोरीच चोरुन नेली असल्याचा पोलिसांचया प्राथमिक अंदाज आहे.
मात्र, आता ही तिजोरी तिला उघडता आली का हा प्रश्न निर्माण झाला आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.