महिलांची होणार हिमोग्लोबीनतपासणी
By Admin | Published: October 13, 2016 02:25 AM2016-10-13T02:25:11+5:302016-10-13T02:25:11+5:30
रक्ताशयाच्या कमी प्रमाणामुळे महिलांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांची हिमोग्लोबीन
पुणे : रक्ताशयाच्या कमी प्रमाणामुळे महिलांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रतिभासंपन्न आरोग्य योजना हाती घेतली आहे. यात वयोगटानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लोहयुक्त गोळ्या दिल्या जाणार आहेत.
या योजनेचा शुभारंभ गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील सरासरी ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताशयाचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात हे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. म्हणजे बुहतांश महिला यामुळे आजारी असतात. घरातील महिला आजारी असली, की अख्खे कुटुंब आजारी असल्यासारखे असते. त्यामुळे ही योजना हाती घेतल्याचे कंद यांनी सांगितले.
जिल्ह्यात १९ लाख महिला आहेत. अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. या महिलांची पूर्ण तपासणी करण्यात येणार होती; मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रत्येक महिलेची पूर्ण तपासणी करण्यापेक्षा काही प्राथमिक तपासणीतही हिमोग्लोबीन कमीजास्त असल्याचे समजते. त्यामुळे आता यासाठी साडेतीन कोटींची रक्कम ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)