महिला स्वीकार केंद्रातील मुलीचा ‘बालविवाह’
By admin | Published: October 23, 2014 05:05 AM2014-10-23T05:05:41+5:302014-10-23T05:05:41+5:30
शहरातील शासकीय महिला स्वीकार केंद्रातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी अधिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बारामती : शहरातील शासकीय महिला स्वीकार केंद्रातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी अधिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचा धमकी देऊन विवाह लावल्याची तक्रार केली आहे.
तक्रारदार हिरालाल गेणबापू कदम यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यानुसार येथील महिला स्वीकार केंद्राच्या अधिक्षिका लता वसंतराव राठोड यांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा तिच्या मनाच्या विरोधात विवाह लावला. ‘तुझी दुसऱ्या संस्थेत बदली करेन’ अशी धमकी देऊन जबरदस्तीने तसेच प्रलोभन दाखून हा विवाह लावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विवाहासाठी अधिक्षिका राठोड यांनी महिला व बालविकास आयुक्तांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २४ जानेवारी २०११ रोजी या मुलीचा गुणवडी (ता. बारामती) येथील रामभाऊ मोतीराम चौगुले याच्याबरोबर विवाह लावला होता. मात्र, हा विवाह अयशस्वी झाला. त्यामुळे ही मुलगी ५ आॅक्टोबर २०१३ रोजी बारामतीच्या महिला स्वीकार केंद्रात आश्रयासाठी पुन्हा दाखल झाली आहे. या मुलीची रेकॉर्डनुसार १९ एप्रिल १९९५ आहे. विवाहाच्या वेळी तिचे वय १५ वर्ष ९ महिने ५ दिवस होते. तिचे अल्पवय असताना देखील अधिक्षिका राठोड यांनी जबरदस्ती करून धमकी देऊन तिचा बालविवाह लावला.