बांधकाम सभापतीवर महिलांचा दावा
By admin | Published: March 22, 2017 03:03 AM2017-03-22T03:03:14+5:302017-03-22T03:03:14+5:30
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषांपेक्षा अधिक संख्या असतानादेखील अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिलांना संधी देण्यात आली नाही.
पुणे : जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषांपेक्षा अधिक संख्या असतानादेखील अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिलांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे महिलांचा सन्मान राखण्यासाठी व त्यांना खऱ्या अर्थाने राजकारणात सक्षम करण्यासाठी बांधकाम सभापती पदासह तीन सभापतिपद महिलांना देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित महिला सदस्यांनी केली आहे.
महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक प्रमाण महिलांचे आहे. परंतु अद्यापही आरक्षण असेल तरच अध्यक्षपदाची माळ महिलांच्या गळ््यात पडते. आजही अनेक महत्त्वाच्या पदापासून महिलांना वंचितच ठेवले जाते. परंतु आता महिलांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली असून, किमान महत्वांच्या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ७५ जागांपैकी ४४ जागांवर राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँगे्रसची एक हाती सत्ता आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या पुरुष सदस्यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीच्या ४४ सदस्यांपैकी महिलांची संख्या तब्बल २५ इतकी आहे. असे असताना देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असून देखील महिलांचा विचार झाला नाही. त्यामुळे आता अध्यक्ष पदानंतर महत्वाचे असणारे बांधकाम सभापती पद महिलांना देण्याची मागणी आता पर्यंत तीन वेळा निवडून आलेल्या वरिष्ठ महिला सदस्या वैशाली पाटील, सुनिता गावडे, राणी शेळके,सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगे्रसच्या सर्व महिला सदस्यांनी केली आहे. बांधकाम सभापती पदासह समाजकल्याण आणि कृषी सभापती पदासाठी देखील महिलांचा विचार करण्याची मागणी महिलांनी केली आहे. त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी व महिलांची सभागृहातील संख्या विचारात घेऊन पक्षाने बांधकाम सभापती पद व अन्य दोन सभापती पद महिलांना देण्याची मागणी महिला सदस्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)