कडूसला गणेशमूर्तींसाठी महिलांचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:04+5:302021-07-17T04:09:04+5:30
अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कडूस गावात ...
अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कडूस गावात मूर्ती बनविण्याचे कारखाने आहे. परंतु गणेशमूर्तीकारांना मागील वर्षीपासून वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जीएसटीचा फटका बसत आहे. तर शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत वाढ झाली आहे. आतापासून गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, वाढता कोरोना व वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचा मोठा फटका मूर्तिकारांना बसत आहे. जीएसटीमुळे शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीमध्ये सतत वाढ होत असून मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसत आहे.
अनेक वस्तू आणि सेवांवर जीएसटी कर लागू होत असल्याने यामध्ये शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचाही समावेश आहे. गणपती मूर्ती बनविण्यासाठी या दोन्ही मूलभूत गोष्टी असल्याने मूर्तिकारांना मोठा फटका बसणार आहे. जीएसटी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने आपसूकच गणेशमूर्तींच्या किमतीतही वाढ होणार आहे. शाडूच्या मातीची एक फुटाच्या मूर्तीची किंमत साधारणपणे तीन हजार रुपये इतकी असते. या किमतीमध्ये तब्बल ८०० रुपयांची वाढ होणार आहे. तर प्लास्टर ऑफ पॅरिसची एक फुटाच्या मूर्तीची किंमत एक हजार रुपये इतकी असते. यामध्येही ७५० ते ८०० रुपयांची वाढ होणार आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या जवळपास सर्वच मूर्ती तयार झाल्या असून, त्याचे रंगरंगोटी व फिनिशिंगचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सर्व गणपतींच्या कच्च्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मूर्तीचे फिनिशिंग व रंगरंगोटीचा पहिला हात देण्यामध्ये मूर्ती कारागीर मग्न झाले आहेत. गणेशमूर्तींच्या रंगकामासाठी प्रामुख्याने नैसर्गिक रंग वापरले जात आहेत. कच्च्या गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे काम पूर्ण झाले असून सध्या मूर्तींना रंगरंगोटीचा पहिला हात देण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मूर्तीचे बारीकसारीक कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
कोरोना विषाणूचं संकट आणि सतत होणाऱ्या लॉकडाऊनमुळे व्यवसायाला मागील वर्षे व यंदा खीळ बसली आहे. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, यंदा गणेशोत्सवावरच परिणाम होईल अशी चिन्हे आहेत. यातून कसं सावरायचं असा प्रश्न पडला असल्याचे कडूस येथील जयश्री जगताप, योगिता जगताप यांनी सांगितले.
कडूसला गणेशमूर्ती कारखान्यात महिलांची लगबग सुरू झाली आहे.