महिला दिन विशेष ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा रुजतोय ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:52+5:302021-03-08T04:11:52+5:30

पुणे : ‘एकटी जाणार? आम्हाला न्यायचं नाही का? कशी मॅनेज करणार? असे अनेक प्रश्न घेऊन २०१६ मध्ये मध्य प्रदेशपासून ...

Women's Day Special 'Solo Traveling' is a growing trend | महिला दिन विशेष ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा रुजतोय ट्रेंड

महिला दिन विशेष ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा रुजतोय ट्रेंड

Next

पुणे : ‘एकटी जाणार? आम्हाला न्यायचं नाही का? कशी मॅनेज करणार? असे अनेक प्रश्न घेऊन २०१६ मध्ये मध्य प्रदेशपासून एकटीने प्रवास करायला सुरुवात झाली. या प्रवासाने खूप काही शिकवलं आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. २०१७ मध्ये युरोपीयन देशांची सफर करण्याचे ठरले. १५ दिवस एकटीने दुस-या देशात कोणीही ओळखीचे नसताना जायचे... थोडी भीती होती पण उत्साह जास्त होता. सोलो ट्रॅव्हल हे स्वातंत्र्याचा अनुभव देतं. लोकांपासून दूर जाण्यासाठी नव्हे, तर स्वत:च्या अधिक जवळ येण्यासाठी सोलो ट्रॅव्हलिंग करायलाच हवं...’ माधवी सुग्रे ही तरुणी आत्मविश्वासाने बोलत होती.

स्वत:चा शोध घेण्यासाठी, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तरुणी आणि महिलांमध्ये ‘सोलो ट्रव्हलिंग’चा ट्रेंड गेल्या काही वर्षात चांगलाच रुजला आहे. आता एकटीने फिरायला जाण्याचा अनुभव घेण्यात वाढ झाली आहे. यातून माणसांची पारख होतेच; मात्र नव्या जगाची ओळख व्हायला खूप मदत होते.

माधवी म्हणाली, ‘पहिल्यांदा विमानप्रवास, तिथल्या बसने, ट्राॅमने प्रवास हे सगळं एकटीने करताना खूप छान वाटत होतं. तिथले लोक, जगण्याच्या पद्धती, संस्कृती, खाद्यसंस्कृती जवळून अनुभवता येते. परदेशात एकटीने प्रवास करणं हा खूप सुंदर अनुभव होता. आव्हानात्मक परिस्थिती आल्यावर एकट्याने त्यातून कसं बाहेर पडायचं हेही लक्षात येतं. जबलपूर, खजुराहो, भोपाळ, हैदराबाद, कर्नाटक, जोधपूर, जैसलमेर, जयपूर, हरिद्वार, ऋषिकेश केदारनाथ, बद्रीनाथ, मसूरी, कुरुक्षेत्र यासोबतच बर्लिन, व्हिएन्ना, प्राग, बुडापेस्ट, बाली, गिली हा प्रवास आजपर्यंत झाला आहे.’

--------------------------

कामाच्या आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकदा सोलो ट्रॅव्हलिंग केलं आहे. २० वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या प्रवासाला सुरुवात झाली. स्वत:वर आणि माणसांमधील चांगुलपणावर विश्वास असेल तर प्रवास सोपा होतो. मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे महत्त्वाचे असते, आपला सिक्स्थ सेन्स सतत जागरुक असायला हवा. एकटीने प्रवास करताना माणसांची पारख होत जाते, स्वचा शोध लागत जातो. एकटीने फिरताना एखादी जागा किंवा माणूस चुकीचा वाटत असेल तर तिथून काढता पाय घ्यावा, धोका पत्करण्यात अर्थ नसतो. तंत्रज्ञान आता अद्ययावत झाले आहे. गुगल मॅपचा आधार घेऊन हॉटेल, पर्यटन केंद्रे, पोलीस स्टेशन, पेट्रोल पंप, जिल्ह्याच्या सीमा, हॉस्पिटल यांचा शोध आधीच घेऊन ठेवावा. अनेकदा एकटीने प्रवास करण्याची इच्छा असली तरी कुटुंबाची परवानगी मिळेल, याबाबत खात्री नसते. अशा वेळी कुटुंबियांना विश्वासात घेऊन जवळच्या ठिकाणापासून सुरुवात करावी. सोलो ट्रॅव्हलिंग करताना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची, आपल्याला आपल्याबरोबर राहण्याची सवय लागते. अर्थातच हा अनुभव सर्व जाणिवा समृद्ध करणारा असतो.

- मुक्ता चैतन्य, सायबर अभ्यासक

-----------------------------

कॉलेजमध्ये असताना आपण मित्र-मैत्रिणींबरोबर खूप फिरतो. लग्न झाल्यावर पती आणि मुलांबरोबर फिरणं होतं. पण एकटं फिरायला जाणं खूप महत्त्वाचं असतं; कारण जेव्हा आपण फक्त स्वत:बरोबर असतो, तेव्हा आपल्याला स्वत:चीच ओळख होते. आपल्या मर्यादा काय, जमेची बाजू काय याची जाणीव होते. स्त्री म्हणून एकट फिरायला जाणं खरंतर खूपच कठीण आहे. पण आजकाल आपल्याकडे खूप सारी साधने उपलब्ध असल्यामुळे ते शक्य झालं आहे. हल्ली घरच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे ते शक्य होतं. मी अडीच वर्षांपूर्वी सोलो ट्रॅव्हलिंग सुरू केलं. पहिल्या वेळेस थोडी धाकधूक होती. नंतर चांगला ग्रुप मिळाल्यामुळे ती कमी झाली. आत्तापर्यंत मी ताडोबा बिदर आणि कुमटा- गोकर्ण येथे सोलो ट्रिप्स केल्या आहेत. सोलो ट्रीपला जायच्या आधी प्रत्येक जागेची आणि आपण जाणार आहोत त्या ग्रुपची माहिती काढणं खूप महत्त्वाचे आहे. मग आपला अनुभव नक्कीच सुसह्य आणि सुखकर होईल.

- विशाखा नवरे, जर्मन प्रशिक्षक

Web Title: Women's Day Special 'Solo Traveling' is a growing trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.