स्त्री सक्षमीकरणाची चळवळ अविरत राहावी- रितू छाब्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 02:24 AM2018-09-20T02:24:36+5:302018-09-20T02:24:54+5:30
‘लोकमत’चा स्त्री सक्षमीकरणाचा हा उपक्रम चळवळीमध्ये रूपांतरित होत आहे.
स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा कणा असते. मात्र, संस्कृती आणि परंपरांनी तिला कायम मागे ठेवले आहे. ‘ती’ला अग्रणी स्थानावर आणण्याची हीच वेळ आहे. महिलांनी आपल्यातील बुद्धीची, प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. ‘लोकमत’चा स्त्री सक्षमीकरणाचा हा उपक्रम चळवळीमध्ये रूपांतरित होत आहे. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशननेही स्त्री सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागात चळवळ उभारली आहे, असे मत ‘मुकुल माधव फाउंडेशन’च्या व्यवस्थापकीय संचालिका रितू छाब्रिया यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती या चळवळीच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाला बळकटी देण्याची केलेली कृती कौतुकास्पद आहे. आरतीच्या माध्यमातून ‘ती’ला पुढे आणण्यासाठी टाकलेले हे सकारात्मक पाऊल आहे, असे मला वाटते. स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा तसेच समाजाचा कणा असते. ती कुटुंबासाठी, सदस्यांसाठी कायम झटत असते. मात्र, संस्कृती आणि परंपरांनी तिला कायम मागे ठेवले आहे. आता, ‘ती’ला अग्रणी स्थानावर आणण्याची हीच वेळ आहे. विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवून स्त्रीने स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आहे. भारतासह अमेरिका, आॅस्ट्रेलिया अशा देशांमध्येही महिलांनी उच्चपदांवर काम करून आपल्यातील बुद्धीची, प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. अग्रभागी राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण, चातुर्य तिच्याकडे आहे. त्यामुळेच ‘लोकमत’चा स्त्री सक्षमीकरणाचा हा उपक्रम चळवळीमध्ये रूपांतरित होत आहे, याचे समाधान वाटते.
फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने कायमच स्त्री सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागातील महिलांना कुशल आणि निपुण बनवण्यासाठी संगणक प्रशिक्षण, शिवणकाम असे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. शिक्षणामुळे, प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत होते. या महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या असल्या तरी विविध कौशल्ये आत्मसात करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावतो. आशा वर्कर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना मदतीचा हात दिला आहे. या महिलांना शासनाकडून अत्यंत तुटपुंजा पगार मिळतो. त्या बदल्यात त्यांना अतिरिक्त काम करावे लागते. त्यांच्या कौशल्याला बळकटी देण्यासाठी सिंबायोसिसच्या साहाय्याने आम्ही नर्सिंग स्कूलच्या माध्यमातून परिचारिकांना प्रशिक्षित केले आहे. रुग्णांना जीवदान देणाऱ्या त्या ‘दूत’ असल्याने त्यांना गुलाबी साड्यांचा पेहराव देण्यात आला आहे. उत्तम प्रशिक्षण मिळाल्याने डॉक्टरांच्या अनुपस्थितीत या परिचारिका तातडीची परिस्थिती हाताळू शकतात. प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील कौशल्य, नैपुण्य वाढीस लागले आहे.
कौशल्य प्रशिक्षणामुळे, आर्थिक सक्षमतेमुळे ग्रामीण भागातील महिला आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कुटुंबातील आपले महत्त्वही त्यांना कळले आहे. स्त्री सक्षमीकरणासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक असताना ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाचा एक भाग होत आल्याचे आम्हाला समाधान वाटते. ‘लोकमत’ची ही चळवळ समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचत आहे. यातून ‘ती’ला समानतेची वागणूक मिळण्यास मदत होत आहे. ‘लोकमत’चा हा उपक्रम वर्षानुवर्षे अविरत सुरू राहावा, हीच इच्छा आहे. यातून समाजामध्ये स्त्रीला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. स्त्रीला सन्मान मिळण्याची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले तर त्यांना चांगली नोकरी मिळू शकेल. कमावत्या झाल्यावर स्त्रीचे घरातील स्थानही बळकट होते. कुटुंबाकडूनही तिला आदराची वागणूक मिळते. कुटुंबाच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिचे मत ग्राह्य धरले गेले पाहिजे. घरातील कामे ही स्त्रीची एकटीची जबाबदारी असून, सर्वांनी तिला मदतीचा हात द्यायला हवा.