खेड तालुक्यात पाण्यासाठी महिलांची होतेय पायपीट
By admin | Published: April 25, 2017 03:57 AM2017-04-25T03:57:05+5:302017-04-25T03:57:05+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत दूर असल्याने नागरिकांना दूरवरची चढण चढत
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत दूर असल्याने नागरिकांना दूरवरची चढण चढत पाणी आणावे लागत आहे. डोंगरावर वसलेल्या ठाकरवाद्यांना अद्यापही रस्ते नसल्याने ठाकरवाडीमधील महिलांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
खेड तालुक्यातील पूर्व भागातील वाकळवाडी, गोसासी, जऊळके खुर्द या गावांच्या ठाकरवाड्यांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांसह लहान मुलांना दीड-दोन किलोमीटर अंतरावरून हंड्यात पाणी घेऊन डोंगराची चढण लागत असल्याने महिलांची दमछाक होत आहे.निवडणुकामागून निवडणुका झाल्या; मात्र येथील गरीब आणि ठाकर समाजातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कधी झालीच नाही.
शासन पिण्याचे पाणी देण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करते. मात्र, या वाड्यावस्त्यांचे पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी योजनेचे प्रस्ताव कधी शासनदरबारी गेले नसल्याने दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकर मागणीचे प्रस्ताव दिले जातात. त्यातही शासनाकडून केवळ एक किंवा दोन टँकर अनेक गावांसाठी सुरू करण्यात येतात. येथील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे. तालुक्यातील काही दानशूर व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून येथे टँकर पाठविण्यात येतो.
(वार्ताहर)