जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वा’चे विविध पैलू उलगडणारा ‘महिला चित्रपट महोत्सव’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 08:53 PM2019-03-07T20:53:30+5:302019-03-07T21:01:18+5:30
महिलांचे काम सर्वांसमोर यावे, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद लोकांना घेता यावा असा विचार महिला पत्रकारांच्या मनात आला आणि याच उद्देशाने २00९ मध्ये ‘आयाम’ या महिला पत्रकारांच्या गटाने ‘महिला चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्यामुळे या विचारांना मूर्त स्वरूप मिळाले.
पुणे :
नम्रता फडणीस
‘ती’ हा शब्द जरी छोटासा वाटत असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ‘ती’ या शब्दामध्येच विश्वाचे मूळ सामावलेले आहे. या शब्दाच्या गहनतेपर्यंत पोहोचणं म्हणावं तितकं सोपं नाही. त्यामुळं केवळ ‘ती’ चा सन्मान किंवा ‘ती’चा आदर करण्याइतपतच ‘जागतिक महिला दिना’च्या
साजरीकरणाचं औचित्य असावं का? तर नक्कीच नाही! ‘ती’नं आजवर केलेला संघर्ष, तडजोड आणि त्यातून समोर बहरून आलेलं ’ती’चं व्यक्तिमत्त्व याचाही कुठंतरी विचार व्हायला पाहिजे. कारण ‘ती’चं स्वत:चं एक स्वतंत्र अवकाश आहे. ‘ती’ला खूप काही सांगायचंय... म्हणूनच वेगवेगळ्या माध्यमांतून का होईना ‘ती’ एखादा विषय आपल्या दृष्टिकोनातून मांडू पाहत आहे. ‘ती’ त्या विषयाकडे कसं पाहते, ‘ती’ काय सांगू पाहत आहे, हे जाणून घ्यायला हवं. आजवर चित्रपटसृष्टीमध्ये महिला दिग्दर्शक, पटकथाकार, सिनेमॅटोग्राफर अशा अनेक पातळ्यांवर ‘ती’ने स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र त्यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्या महिलांचे काम सर्वांसमोर यावे, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद लोकांना घेता यावा असा विचार महिला पत्रकारांच्या मनात आला आणि याच उद्देशाने २00९ मध्ये ‘आयाम’ या महिला पत्रकारांच्या गटाने ‘महिला चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्यामुळे या विचारांना मूर्त स्वरूप मिळाले.
यंदा महोत्सव दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. नऊ वर्षांत महोत्सवामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक विषयांची मांडणी करण्यात
आली. मग त्यात महिला दिग्दर्शकांनी हाताळलेले विषय असोत किंवा ‘ती’चा आत्मसन्मान, कुटुंबाचा विरोध पत्करून ‘ती’ने उचललेले अभिनव पाऊल, स्त्रीवादी लेखिकांच्या कलाकृतींवर आधारित चित्रपट अशा अनेक संकल्पनांवर महोत्सव आयोजित करण्यात आला. सलग दहा वर्षे महिलांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानावर आधारित साजरा होणारा हा राज्यातील पहिला चित्रपट महोत्सव आहे,याचा अभिमान आहे. महोत्सवाला कोणतेही ग्लॅमर नसतानाही स्त्रीवादी लेखिका सानिया, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, ‘धग’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेलीउषा जाधव, अभिनेत्री नीना कुलकर्णी यांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक मान्यवरांनी महोत्सवाला हजेरी लावली असून, महोत्सवाला येण्याची आपणहून इच्छा प्रदर्शित करतात. हीच या महोत्सवाची जमेची बाजू आहे.
उद्या (8 मार्च) पासून तीन दिवस देश-विदेशातील विविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही यंदाच्या
महोत्सवाची संकल्पना आहे. प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक अंजली मेनन, समीक्षक मीनाक्षी शेड्ड्ये यांची उपस्थिती महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
चित्रपटसृष्टीतील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला समर्पित असलेला हा महोत्सव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महोत्सवाच्या तारखा काय? असे प्रेक्षक
आवर्जून चौकशी करतात, तेव्हा आम्ही महोत्सव पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात स्थिरस्थावर करण्यास यशस्वी ठरलो याचा आनंद वाटतो. साचेबद्ध
कार्यक्रमांपेक्षा एका वेगळ्या माध्यमातून आम्ही ‘स्त्रीत्वा’चा अनोखा उत्सव साजरा करतोय हेच समाधान खूप आहे.