महिला सन्मान केवळ एकच दिवस; ३६४ दिवसांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:29+5:302021-03-08T04:12:29+5:30

समाजात एकीकडे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असताना समाजमाध्यमांवरही त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांचे अश्लील शेरेबाजी आणि ...

Women's honor only one day; What about 364 days? | महिला सन्मान केवळ एकच दिवस; ३६४ दिवसांचे काय?

महिला सन्मान केवळ एकच दिवस; ३६४ दिवसांचे काय?

Next

समाजात एकीकडे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असताना समाजमाध्यमांवरही त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांचे अश्लील शेरेबाजी आणि अपमानजनक वक्तव्यांमधून सामाजिक आणि मानसिक अध:पतन केले जात आहे. हे प्रकार रोखणार कोण? आणि कसे? असा प्रश्न नेटिझन्स महिलांकडून विचारला जात आहे. एखाद्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. चर्चा घडणं, संवाद होणं हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र सोशल मीडियावर महिलांच्या अभिव्यक्तीचीच मोठ्या प्रमाणावर गळचेपी केली जात आहे. एखाद्या विशिष्ट विषयावरची तिची मते किंवा विरोध अनेकांना मान्यच होत नाही, याकडे महिलांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ओटीटी व्यासपीठावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने नवीन नियमावली आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सोशल मीडियावर महिलांच्या केल्या जाणा-या शोषणाविरुद्ध देखील कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्याकडे महिलांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तसे फार नाही. सोशल मीडियावर एखाद्या महिलेने विरोधी विचार व्यक्त केले तर तिच्यावर अश्लील शेरेबाजी करणे किंवा धमक्या देणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्याकडे महिलांनी फारसे लक्ष द्यायची गरज नाही. आपण त्यांना किती महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. जी लोक आपल्याला माहितीदेखील नाही त्यांच्या मताला एवढी किंमतदेखील द्यायची गरज नाही. त्यांनी ट्रोल केले तर ते संस्कारानुसारच वागत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कायदे आहेत त्याचा आधार घेत त्यांची गळचेपी नक्कीच केली जाऊ शकते. पण त्यांना जास्त महत्त्व द्यायची गरज वाटत नाही. त्यांना अनुल्लेखानेच मारले पाहिजे. महिला आपापल्यापरीने सक्षम आहेत केवळ आपल्या ध्येयाने लक्ष द्यावे. रिकामटेकड्या लोकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

- रेणुका शहाणे, प्रसिद्ध अभिनेत्री

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मला सातत्याने सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा धमक्या मिळाल्या आहेत. एखाद्या पक्षाचे नेतृत्व करताना विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्यास त्यांच्याकडून व्हिडीओ करून धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याची कायदेशीरपणे चौकशी व्हावी, अशी माझी सातत्याने मागणी आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा स्वीकारताना त्याचा आनंद वाटतो तशी खंतदेखील वाटते. एका महिला दिनी आमच्या कर्तृत्वाच्या सन्मान होतो. पण उर्वरित ३६४ दिवसांचे काय? असा प्रश्न देखील पडतो. एक दिवसाच्या सत्कार किंवा सन्मानापेक्षा ३६५ दिवस सन्मान, स्वाभिमान आणि सुरक्षिततेचे दिले तर आमचा ३६५ दिवसच महिला दिन साजरा होऊ शकेल.

- रूपाली चाकणकर, प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला आघाडी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोशल मीडियावर महिलांना केल्या जाणा-या ट्रोलिंगविरोधात तक्रारी येत नाहीत. केवळ वैयक्तिक वाद असतील किंवा घट्स्फोटाच्या प्रकरणात एकमेकांशी केले जाणारे चॅट अशा स्वरूपाच्या तक्रारी येतात. सोशल मीडियावर महिलांना त्रास होऊ नये याकरिता महिलांनी आपले फोटो व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा फेसबुकचे प्रोफाइल फोटो म्हणून ठेवू नयेत किंवा आपले वैयक्तिक फोटो कुणाकडेही शेअर करू नयेत.

- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर शाखा

------------------------------

Web Title: Women's honor only one day; What about 364 days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.