महिलांची सुरक्षितता ऐरणीवर: दक्षता समित्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:27+5:302021-03-06T04:11:27+5:30
पुणे : शहरातील महिला तसेच मुली यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी होत्या त्याप्रमाणे दक्षता समित्यांची स्थापना करून ...
पुणे : शहरातील महिला तसेच मुली यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी होत्या त्याप्रमाणे दक्षता समित्यांची स्थापना करून त्या त्वरित कार्यरत कराव्यात, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली.
बाणेरमधील एका क्लबजवळ रोजच मारामाऱ्या, भांडणे होत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते. वस्तुंची चोरी होते. आग लावली जाते. तिथेही पूर्वी असलेले चेक पोस्ट बंद का केले अशी विचारणा करत चव्हाण यांनी ते सुरू करावे असे सांगितले. समाज माध्यमातून अयोग्य, दोन समाजात तेढ वाढेल, असा मजकूर प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते यांची बदनामी केली जात आहे, अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील चौकांमधल्या सिग्नल्सवर मुलांच्या माध्यमातून भीक मागण्याचे प्रमाणही वाढत आहे, पोलिसांनी यात लक्ष घालावे, सामाजिक भान लक्षात घेऊन या समस्येचे निराकरण करावे असे त्यांनी सांगितले. गुप्ता यांनी या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. चव्हाण यांच्यासमवेत अशोक राठी, नितीन कदम, महेश हांडे, नितीन जाधव, मनाली भिलारे, राकेश कामठे, मनोज पाचपुते, विपुल म्हैसूरकर, अप्पासाहेब जाधव, अॅड. दिव्या जाचक उपस्थित होते.