महिला सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:28 AM2017-08-08T03:28:41+5:302017-08-09T03:51:36+5:30
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणि मुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता.
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणि
मुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालाकडे पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि महावितरण अशा सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष झाले असून, यंत्रणांच्या उदासीनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महिला छेडछाड, रोडरोमिओंचा सहन करावा लागणारा त्रास, पाठलाग, एकतर्फी प्रेमामधून होणारी छळवणूक अशा एक ना अनेक समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामधून होणाºया मानसिक त्रासामधून अनेक मुली आणि महिलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे ताजी आहेत. आजही शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, बसथांबे, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर महिलांना ‘ईव्ह टिसिंग’चा सामना करावा लागतो. या छेडछाडीचा सामना कसा करायचा, पोलिसांची मदत कशी घ्यायची, यासोबतच स्वसंरक्षण कसे करावे यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासमधील मुलींशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हा संवाद काही दिवसच चालला.
पोलिसांच्या दृष्टीने यातील ‘हॉट पॉइंट्स’वर विशेष लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी गस्त वाढवणे, गर्दीच्या वेळी, सकाळी आणि संध्याकाळी पोलिसांचा या भागात वावर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवस चाललेले पोलिसांचे हे सोपस्कार नंतर बंद पडले. जाता येता कधीतरी एखादी चक्कर मारली म्हणजे झाले, अशी भूमिका सध्या पोलिसांनी घेतल्याचे चित्र आहे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे जोडप्यांसाठी धोकादायक असून, कोणताही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते अशा ठिकाणांवर पोलिसांनी गस्त घालणे, त्यांना हटकणे आवश्यक आहे.
संवेदनशील ठिंकाणांवर हवे लक्ष
शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्लीबोळ, बाजार, क्लासेस, बसथांबे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते आणि खाऊ गल्ल्या आदी ठिकाणांची पाहणी केल्यानंतर महिला सुरक्षा समितीने काही निष्कर्ष काढले होते.
संवेदनशील ठिकाणांची यादी चारही परिमंडलांच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आली होती. या यादीमध्ये यापूर्वी महिला छेडछाड अथवा गैरप्रकार घडलेल्या ठिकाणांचाही समावेश करण्यात आला होता.
काय होती महत्त्वाची कामे?
1 ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.
2 सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे मुख्यत्वे करून पालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एकत्रितपणे करणे
3 पालिकेची स्वच्छतागृहे, पथदिवे, भुयारी मार्ग, रात्रीच्या वेळी बागांमधली सुरक्षा आणि प्रकाश व्यवस्था पोलिसांनी तपासणे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे धोकादायक, त्यांना हटकणे.
महापालिका आणि महावितरणच्या मदतीने ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे-खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यासाठी महिला सुरक्षा समितीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकाºयांसह महापालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे. या समितीची दर महिन्याला बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, या बैठकाच बंद पडल्या आहेत. ही समितीही विखुरली असून याबाबत ना कोणाला गांभीर्य आहे ना खंत.
उपाययोजनेकडे दुर्लक्ष!
या समितीमार्फत शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन स्थळे, बागा या ठिकाणी असणाºया सुरक्षेची नियमित पाहणी करण्यात येत होती. या ठिकाणी असणाºया विजेची उपलब्धता, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यांची उपलब्धता पाहून त्यावर वेळोवेळी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. शहरातील महिलांसाठी सुरक्षित नसलेल्या ठिकाणांचीही पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे तसेच शहरातील रस्त्यांवरील, इतर सर्व ठिकाणचे वातावरण सुरक्षित व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निकष पाळले जात नाहीत.
महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभागातील अधिकाºयांची संयुक्त महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या. शहरातील विविध रस्ते, स्वच्छतागृहे, बसथांबे आदी ठिकाणांची पाहणी करून तेथे संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून या समितीच्या बैठका बंद पडल्या आहेत.
ही होती ‘ती’ संवेदनशील ठिकाणे
जिजामाता महाविद्यालय, शुक्रवार पेठ
आरसीएम गुजराथी हायस्कूल
एसीसी क्लासेस, कसबा पेठ
एस. पी. महाविद्यालय
भारत इंग्लिश स्कूल
फर्ग्युसन महाविद्यालय
एसएनडीटी कॉलेज
आपटे हायस्कूल
एमआयटी कॉलेज परिसर
स्वानंद रोड ते कर्वे चौक बसथांबा
कमिन्स कॉलेज ते कर्वे चौक
आझम कॅम्पस
एम. जी. रस्ता
पुणे स्टेशन परिसर
दस्तूर मेहेर हायस्कूल
एस. व्ही. युनियन हायस्कूल
सारसबाग
मुक्तांगण शाळा
अरण्येश्वर
शाहू कॉलेज
भारती विद्यापीठ कॅम्पस व आजूबाजूचा परिसर
बिबवेवाडी कॉर्नर
महेश सोसायटी
आनंदनगर
सिम्बायोसिस कॉलेज
हिंजवडी
शिवार गार्डन काळेवाडी
नृसिंह हायस्कूल, सांगवी
कृष्णा बाजार चौक, नवी सांगवी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
डी. ए. व्ही. स्कूल औंध
सूस खिंड टेकडी
डी. वाय. पाटील महाविद्यालय संत तुकारामनगर
शगुन चौक पिंपरी
भक्तिशक्ती चौक निगडी
फत्तेचंद जैन हायस्कूल चिंचवड
पीएमटी बसथांबा चौक चिंचवड
शाहूनगर
स्वामी विवेकानंदनगर दापोडी
पीएमटी चौक भोसरी
खडकी बाजार
आलेगावकर शाळा
भैरवनगर
गायकवाडनगर व ज्युनिअर कॉलेज परिसर
मोझे शाळा
एमआयटी कॉलेज देहूफाटा
गेनबा मोझे शाळा
नेताजी हायस्कूल प्रतीकनगर
सिम्बायोसिस कॉलेज परिसर
फिनिक्स मॉल परिसर
देसरडा क्लासेस
आनंदबाग
सुंदरबाई मराठी शाळा
तुकाराम पठारे विद्यालय
चंदननगर