महिला सुरक्षारक्षकाला मारहाण
By admin | Published: December 22, 2016 02:28 AM2016-12-22T02:28:02+5:302016-12-22T02:28:02+5:30
कामावर १५ मिनिटे उशिरा आल्याच्या कारणावरून एका महिला सुरक्षारक्षकाला पर्यवेक्षकाकडून धक्काबुक्की आणि पट्टीने मारहाण
पुणे : कामावर १५ मिनिटे उशिरा आल्याच्या कारणावरून एका महिला सुरक्षारक्षकाला पर्यवेक्षकाकडून धक्काबुक्की आणि पट्टीने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. १७ डिसेंबरला सायंकाळी सव्वापाच वाजता ससूनच्या जमादार कार्यालयाजवळ हा प्रकार घडला होता.
या महिलेने पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे आणि बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. यावरून सुरक्षारक्षक एजन्सीने त्या पर्यवेक्षकाचे ससूनमधील काम थांबवले आहे.
ससून रुग्णालयात १२५ सुरक्षारक्षक आणि तीन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. संबंधित महिला सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिलेल्या अर्जानुसार शनिवारी सकाळी नऊ वाजता त्या महिलेला कामावर बोलावले होते. मात्र तिला येण्यास थोडा उशीर झाला. पर्यवेक्षकाने तिला सायंकाळी पाचऐवजी १५ मिनिटे उशिरा जाण्यास सांगितले. मात्र महिलेने वेळेत आले असल्याचे सांगितले.
पाच वाजता ड्यूटी संपवून त्या निघाल्या असता त्या पर्यवेक्षकाने तिला जमादार कार्यालयात अडवले आणि धक्काबुक्की केली. तसेच पट्टीने मारहाण केली.
त्या महिलेला साडेपाच वाजता सोडण्यात आले. रविवारी सुटी असताना संबंधित पर्यवेक्षकाने जबरदस्तीने कामावर बोलावले. रविवारी घरी दोन मुलांना एकटे सोडून कामावर यावे लागले, असे या महिलने ससून प्रशासन, सुरक्षारक्षक मंडळ व पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.