चोरट्यांकडून महिला टारगेट , पर्स चोरीच्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:00 PM2018-05-21T16:00:03+5:302018-05-21T16:00:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर, कोथरूड भागात महिलांकडील पर्स, दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.
पुणे : शहरात महिलांकडील पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. नळस्टॉप चौकानजीक दुचाकीस्वार नृत्यदिग्दर्शक युवतीची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी पहाटे घडली. पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोकड, एटीएम कार्ड, वाहन परवाना असा २५ हजारांचा ऐवज होता.
याप्रकरणी मंजू विश्वनाथ वाघमारे (वय २६, रा. शिवाजीनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंजू वाघमारे नृत्यदिग्दर्शिका आहेत. या कार्यक्रमासाठी त्या बाहेर गेल्या होत्या. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास दुचाकीस्वार मंजू नळस्टॉप चौकातून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी अमृतेश्वर हॉटेलसमोर दुचाकीस्वार मंजू यांची पर्स हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. पोलिसांकडून चोरटयांचा माग काढण्यात येत आहे. नळस्टॉप चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर, कोथरूड भागात महिलांकडील पर्स, दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. महिन्याभरात चोरट्यांनी पर्स हिसकावण्याचे चार गुन्हे केले आहेत. जंगली महाराज रस्त्यावर परगावाहून आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. पर्समध्ये ८० हजारांची रोकड होती. मात्र, अद्याप चोरट्यांना पकडण्यात आले नाही. पर्स हिसकावण्याचे गुन्हे चोरट्यांनी पहाटे केले आहेत.