‘कसं जायचं शौचाला?’ : महिलांचा सवाल; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:52 PM2018-01-12T12:52:18+5:302018-01-12T12:54:45+5:30
मोडलेले दरवाजे... दरवाजाला कडीच नाही... स्वच्छतागृहाची व्यवस्था बरी, तर त्यात पाणी व लाईटची सोय नाही... ही स्थिती आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची.
पुणे : मोडलेले दरवाजे... दरवाजाला कडीच नाही... स्वच्छतागृहाची व्यवस्था बरी, तर त्यात पाणी व लाईटची सोय नाही... ही स्थिती आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची. यामुळे विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांवर ‘तुम्हीच सांगा, कसं जायचं शौचाला?’ म्हणण्याची वेळ आली आहे. अभिव्यक्ती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये ११३ पैकी ८७ स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोयच नसल्याचे समोर आले आहे. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची संख्याच खूप कमी अन् अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था व दुर्गंधी यामुळे सर्वांजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.
महिलांसाठी मोफत, स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, प्रत्येक दोन किलोमीटरवर स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यात पुरेसे पाणी, वीज, स्वच्छता, कचऱ्याच्या डब्याची सोय, सुरक्षित स्थितीतील दरवाजे आदी सुविधा असाव्यात अशा हक्काच्या मागण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरदार महिला आणि नागरिकांनी गुरुवारी महापालिकेच्या समोर आंदोलन केले. यामध्ये अभिव्यक्ती, सोशालिस्ट महिला सभा, लोकायत, सोशालिस्ट पार्टी (इंडिया) आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. या वेळी अभिव्यक्तीच्या अलका जोशी यांनी सांगितले, की पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठेमोठे उड्डाणपूल उभे केले जात आहेत, मेट्रो आणली जात आहे; परंतु अत्यावश्यक गरजेच्या गोष्टींसाठी खर्च करण्यास महापालिकेकडे निधी नाही.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहराच्या अंदाजपत्रकात महिला स्वच्छतागृहांसाठी पुरेशी तरतूदच नसणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहाअभावी लघवी रोखून धरावी लागते. परिणामी मूतखडा, बद्धकोष्ठता, अर्धशिशी अशा अनेक आजारांना त्या बळी पडतात. या वेळी अनिता नाकाडे व सायली स. प्र. उपस्थित होत्या.
महिलांसाठी तुटपुंज्या संख्येने असलेली स्वच्छतागृहे ही मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असून, तेथे पाणी, विजेची सोय नाही, दरवाजे-कड्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे अशा स्वच्छतागृहांचा वापर करताना महिलांना असुरक्षित वाटते. या पार्श्वभूमीवर, महिलांसाठी पुरेशा संख्येने महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत म्हणून ‘राईट टू पी’ मोहीम राबविण्यात येत आहे.
- वर्षा गुप्ते
मोफत वाय-फाय अशा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना महिलांच्या नैसर्गिक विधीसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची उभारणी केली जात नाही.
- शकुंतला भालेराव