वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 03:38 PM2018-05-22T15:38:24+5:302018-05-22T15:38:24+5:30

खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर चितारली जात असलेली वारली कला या ऐतिहासिक ठेव्याची साक्षीदार ठरणार आहे.

Wonderful beauty in Warli art on gate of Cantonment board | वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर  

वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर  

googlenewsNext
ठळक मुद्देआठ विद्यार्थी व शिक्षकाकडून साकार: जीवा सोम्या मशे यांना आदरांजली येत्या २५ मे रोजी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कमानीवर साकारलेल्या वारली चित्रांचे अनावरण

श्रीकिशन काळे 
पुणे : वारली कला म्हणजे आदिवासी जीवनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या कलेतून त्यांचे जीवन सहजरित्या समोर येते. ही कला महाराष्ट्राचे भूषण आणि लोकसंस्कृती आहे. वारली कलेच्या सौंदर्याने नेहमीच लोकांना भुरळ घातली आहे. वारली कलेच्या अद्भुत आविष्काराला रसिकांचे उत्स्फूर्त व भरभरुन प्रेम मिळाले. अशी ही वारली कला...तिचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचावा आणि सामान्य नागरिकांपर्यंत या कलेचा प्रसार व्हावा,यासाठी खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर वारली कला चितारली जात आहे. आठ विद्यार्थी व कला शिक्षक यांनी मिळून ही कला साकारत आहेत. ही वारली कला रस्त्यावरच्या मुसाफिरांना क्षणभर मोहिनी घालत त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 
जागतिक पातळीवर घेऊन जाणारे विख्यात चित्रकार जिव्या सोमा मशे यांचे नुकतेच निधन झाले. या कलेच्या माध्यमातून जिव्या सोमा मशे यांना एक प्रकारची आदरांजलीच वाहण्यात येत आहे. या कलेचा वारसा अहमदनगर येथील शिक्षक अरविंद कुडिया हे जपत आहेत. ते गेल्या बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना वारली कलेचे धडे देत आहेत. त्यांची ही कला पाहून खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमोल जगताप यांनी खडकीच्या मुख्य कमानीवर ती साकारावी, अशी कल्पना मांडली. त्यामुळे कुडिया व त्यांचे आठ विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून कमानीवर कला साकारत आहेत. यामध्ये दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी आहेत. 


याबाबत कुडीया म्हणाले, वारली ही आपली संस्कृती आहे. ती लोप पावू नये आणि जपली जावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. गेल्या बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना वारली कलेचे शिक्षण देत आहे. ही खूप सुंदर लोक कला आहे. महाराष्ट्राचे ते भूषण आहे. ही कला खडकीचे सीईओ अमोल जगताप यांनी पाहिली. त्यामुळे त्यांनी या कलेसाठी काही तरी केले पाहिजे असे सांगितले. त्यांनाच ही कल्पना सुचली की, कँटोन्मेंटच्या भिंतीवर वारली चित्रसौंदर्य साकारले जावे, त्यांनी मला बोलवले आणि आम्ही मग काम सुरू केले. नगरच्या कँटोन्मेंट शाळेतील आठ विद्यार्थी आम्ही निवडले आणि गेल्या आठ दिवसांपूर्वी काम सुरू झाले. मुलांमध्ये देखील खूप उत्साह आहे. त्यांना छान वाटत आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. काडी किंवा तांदळाच्या पिठाऐवजी आम्ही अँक्रोलिक कलरने वारली चित्रे काढत आहोत. कारण भिंतीवर असल्याने ते लवकर खराब होऊ नये यासाठी कलरने काढत आहोत. पुढील पाच वर्षतरी याला काही होणार नाही.’’  
मोकळा वेळ वारली कलेसाठी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडे मोकळा वेळ असतो. या वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी अरविंद कुडिया हे दोन ते तीन तास विद्यार्थ्यांना वारली कलेचे धडे देतात. मुलांचा वेळ आणि ऊर्जा चांगल्या ठिकाणी लागावी. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी ते विद्यार्थ्यांना वारली शिकवत आहेत.  
जीवा सोम्या मसे यांच्याकडून प्रेरणा 
‘‘काही वर्षांपूर्वी मी जीवा सोम्या मसे यांना थोडा वेळच भेटलो होतो. तेव्हा त्यांच्यातील ही कला, त्या कलेविषयीची आत्मियता पाहून मलाही ही कला जतन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची ती भेट माझ्यासाठी खूप सकारात्मक होती. त्यांचे काम प्रचंड आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने ही कला जोपासली. ही कला अत्यंत सोपी आणि सुंदर आहे. त्यातून खूप सुंदर भाव व्यक्त करता येतात. या कलेसाठी काही तरी करावे म्हणून मी विद्यार्थ्यांना शिकवतो,’’ अशा भावना अरविंद कुडिया यांनी व्यक्त केल्या. 
 
शनिवारी अनावरण होणार 
येत्या २५ मे रोजी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कमानीवर साकारलेल्या वारली चित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे. ही वारलीचे चित्र २२ फूट उंच आणि ६५ फूट रूंद आहे. 

Web Title: Wonderful beauty in Warli art on gate of Cantonment board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.