अबब...! पुणे महापालिकेने बांधली ६२ हजारांची एक पायरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 08:38 PM2019-05-21T20:38:47+5:302019-05-21T20:46:47+5:30
लहान मुलांना खेळण्यासाठी जाता यावे तसेच नदीपात्रामध्ये स्वच्छता करता यावी करिता पालिकेच्यावतीने डी. पी. रस्त्यावरील शाहू वसाहतमध्ये १४ पायऱ्या बांधण्यात आल्या...
पुणे : लहान मुलांना खेळण्यासाठी जाता यावे तसेच नदीपात्रामध्ये स्वच्छता करता यावी करिता पालिकेच्यावतीने डी. पी. रस्त्यावरील शाहू वसाहतमध्ये १४ पायऱ्या बांधण्यात आल्या असून यासाठी सव्वा नऊ लाखांची निविदा काढण्यात आली होती. पालिकेला एक पायरी तब्बल ६२ हजारांना पडली असून याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाताना ज्ञानदा शाळेसमोर रस्त्याच्या डाव्या हाताला शाहू वसाहत आहे. या वसाहतीमध्ये निमुळ बोळा असून येथील डीपी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. मुलांना खेळायला जागा नाही. येथील मुले नदीपात्रामध्ये खेळायला जातात. वस्ती आणि नदीच्यामध्ये संरक्षक भिंत आहे. सिमाभिंतीलगत नदीपात्राच्या दिशेने तीव्र उतार आहे. तसेच या पात्रामध्ये दलदल आणि झाडेझुडपे उगवलेली आहेत. याठिकाणी पालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून घाट बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून ९ लाख ९७ हजार ८७० रुपयांचे पुर्वगणन पत्रक तयार करुन या कामाची निविदा काढण्यात आली.
निविदा पॉईंट ९९ टक्के (.९९%) कमी दराने आलेल्या निविदेनुसार के. के. कंपनीला कार्यादेश (वर्क आॅर्डर) देण्यात आली. हे काम तीन महिन्याच्या मुदतीत करायचे असून त्याला सुरुवातही झाली आहे. याठिकाणची तीन झाडेही कापण्यात आली आहेत. साधारण १५ फूट लांब जागेत तीन ते चार फूट रुंदीच्या १४ पायºया बांधण्यात आल्या आहेत.
====
डीपी रस्त्याचे रुंदीकरण झाले असून याठिकाणी मुलांना खेळायला जागा शिल्लक नाही. या मुलांना नदीपात्रात खेळता यावे तसेच नदीपात्राची स्वच्छता करता येईल याकरिता नदीपात्रात उतरण्यासाठी घाट बांधून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानुसार २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १० लाख रुपयांची तरतूद केली होती. निविदा काढूनच हे काम केले जात आहे. हे काम करत असताना एकही झाड तोडण्यात आलेले नाही. जेवढे काम होईल, तेवढेच बील अदा केले जाणार आहे.
- जयंत भावे, स्थानिक नगरसेवक