लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजना होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:06+5:302021-03-09T04:14:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्यातील व बारामती तालुक्याच्या हद्दीतील सुमारे ५ हजार हेक्टर शेती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील व बारामती तालुक्याच्या हद्दीतील सुमारे ५ हजार हेक्टर शेती क्षेत्रास बंद पाईप लाईनने, सिंचनाचा लाभ देेण्यासाठी लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या सन २०२० -२१ या वर्षासाठी, जलसंपदा विभागाला तब्बल १२ हजार कोटी पेक्षा जास्त निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडताना प्रस्तावित केला आहे. त्यामुळे तीन दशकांपासून खोळंबलेल्या लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजनेलाही यात भरिव तरतुद असल्याने ही योजना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना ३० वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापुर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही महिन्यात इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरीदेखील घेण्याचे काम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आज झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतुद केल्याने ही योजना लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी २२ गावातील जिरायती शेती बागायती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केल्यानंतर लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजना व शेतीसाठी पाणी यासंदर्भात निधी दिल्याची घोषणा ऐकताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहे.
चौकट :
तालुक्याचा कायमचाच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची, विरोधकांनी वीस वर्षे पाणी प्रश्नावर फसवणूक केली. राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजना तसेच उजनी धरणातील पाणी उचलण्याच्या योजनेसाठी मी प्रयत्न करत असून या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुळे यश मिळाले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
चौकट :
अर्थसंकल्पाच्या दहा टक्के निधी दोन तालुक्यांना
महाराष्ट्रातील सिंचनासाठी राज्य सरकारने बारा हजार कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी इंदापूर व बारामती तालुक्यातील सिंचनासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. सिंचन बजेटच्या दहा टक्के निधी दोन तालुक्यांना मिळतो हे अभिमानस्पद बाब आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याबद्दल आम्ही शेतकरी त्यांचे कायमऋणी राहू.
- डी. एन. जगताप - शेतकरी