रायरेश्वर किल्ल्याच्या शिडीला लाकडाचा ठेपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:09 PM2019-01-11T23:09:09+5:302019-01-11T23:11:02+5:30
अपघात होण्याची शक्यता : शिडी गंज लागून खराब
महुडे : स्वराज्याची पहिली शपथ भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पर्यटकांसाठी व रायरेश्वर ग्रामस्थांना चढउतार करण्यासाठी १९९२मध्ये लोखंडी शिडी बसविण्यात आली. परंतु, आज ती शिडी गंज लागून खराब झाली आहे. या खराब शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी काळजी म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांकडून त्या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या गेल्या आहेत.
भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले ठिकाण असल्याने अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली तसेच पर्यटक किल्ल्याला कायम वर्षभर भेट देण्यासाठी येतात. किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मार्ग शिडीने चालू होतो. या लोखंडी शिडीला गंज लागून काही पायऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत. एके ठिकाणी शिडी झुकलेली दिसत आहे. या शिडीवरून पर्यटक, विद्यार्थी व रायरेश्वरावरील ग्रामस्थ ये-जा करतात. या शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांनी या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या आहेत. ही शिडी शेवटच्या घटका मोजत असल्याने प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार? मोठी दुर्घटना झाल्यावर काय होईल? असे अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांना पडले आहेत. रायरेश्वरावरील एखादी
व्यक्ती आजारी असल्यास उपचारांसाठी त्या व्यक्तीला डोली करून घेऊन जावे लागते.
रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी असणारा रस्ता दुरुस्त करावा तसेच रायरेश्वर ग्रामस्थांना व पर्यटक यांच्यासाठी चढउतार करण्यासाठी असणारी लोखंडी शिडी नवीन मिळावी, अशी मागणी रायरेश्वर ग्रामस्थांकडून ग्रामस्थ समीर घोडेकर व सरपंच दत्तात्रय जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.